हॉकी ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप
कोव्हिलपट्टी / वृत्तसंस्था
11 व्या हॉकी इंडिया ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत हॉकी हरियाणा, हॉकी चंदिगड, हॉकी कर्नाटक व हॉकी पंजाब या चारही संघांनी पहिल्या दिवशी विजयी सलामी दिली. त्यांनी अनुक्रमे तेलंगण हॉकी, हॉकी आंध्र प्रदेश, हॉकी मिझोराम व केरळ हॉकी संघांना मात दिली.
हॉकी हरियाणाने क गटातील लढतीत तेलंगण हॉकीचा 12-2 असा एकतर्फी धुव्वा उडवला. दीपक या विजयात हॅट्ट्रिक हिरो ठरला. त्याने 9, 40 व 51 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. याशिवाय, पंकजने 5 व्या, अंकुशने 13 व 22 व्या मिनिटाला, अमनदीपने 13 व 52 व्या मिनिटाला, रोहितने 14, अमित चहलने 15, दीपकने 27 तर पंकजने 43 व्या मिनिटाला गोल करत हरयाणाचा विजय साजरा केला. तेलंगणतर्फे कर्णधार संतोष नेतावथने 31 व्या तर धर्मवीर चंद भवानीने 23 व्या मिनिटाला गोल केले.
ड गटातील लढतीत हॉकी चंदिगढने हॉकी आंध्र प्रदेश संघाचा 23-0 असा एकतर्फी फडशा पाडला. चंदिगढ संघातर्फे तब्बल 9 हॉकीपटूंनी किमान एक तरी गोल नोंदवला. रमणने 5 गोल करत आंध्र प्रदेशच्या बचाव फळीची लक्तरे जणू वेशीवर टांगली. त्याने 33, 38, 39, 55 व 58 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा वेध घेतला. सुमित (7, 31, 46, 47), रोहित (2, 6, 34), गनदीप सिंग (10, 36, 60), कर्णधार राहुल (42, 43), इंदरपाल सिंग (28, 59), हरमनप्रीत सिंग (18), प्रथम शर्मा (24), गुरकिरत सिंग (57), परमवीर सिंग (60 वे मिनिट) यांनीही सातत्याने गोल नोंदवले.
ड गटातील आणखी एका सामन्यात हॉकी कर्नाटकने हॉकी मिझोरमचा 24-0 असा धुव्वा उडवला. चिरन मेदप्पाने कर्नाटकतर्फे चक्क 8 गोल नोंदवले. त्याने 2, 24, 28, 30, 39, 42, 45, 56 व्या मिनिटाला गोल केले. कर्णधार सीबी पूवन्नाने 5, 41, 50 व 51 व्या मिनिटाला तर राहुल सीजेने 18, 32, 60 व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय, प्रज्वल (35, 37), लेक्कला हितेश राव (53, 58), भरत (17, 43), विश्वास जी (10), पुवैय (16), मज्जी गणेश (41) यांनीही गोल नोंदवले.
ई गटात हॉकी पंजाबने केरळ हॉकीचा 13-0 असा फडशा पाडला. पंजाबतर्फे संजय कुमार (8, 14), अमृतपाल सिंग (24, 41), राजिंदर सिंग (41, 55), जसपाल सिंग (12), रवनीत सिंग (13), सिमरनजोत सिंग (23), गुरप्रीत सिंग (30), अजयपाल सिंग (34), भरत ठाकुर (53) व अर्शदीप सिंग (58) यांनी गोल केले.









