ऍशेस मालिकेतील दुसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाचा डाव 9 बाद 473 वर घोषित,
ऍडलेड / वृत्तसंस्था
मार्नस लाबुशाने (103) दिवस-रात्र कसोटी इतिहासात तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथे दुसऱया ऍशेस कसोटी सामन्यातील आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. कर्णधार स्टीव्ह स्मिथचे शतक मात्र अवघ्या 7 धावांनी हुकले. प्रत्युत्तरात इंग्लंडची प्रारंभीच दाणादाण उडाली आणि दुसऱया दिवसअखेर 17 धावांसाठी त्यांना पहिले 2 गडी गमवावे लागले. इंग्लंडचा संघ या लढतीत अद्याप 456 धावांनी पिछाडीवर आहे.
लाबुशानेचे तडफदार शतक हे ऑस्ट्रेलियन डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. त्याने 305 चेंडूत 8 चौकारांसह 103 धावांचे योगदान दिले. 2 बाद 221 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर पहिल्या 40 मिनिटात त्यांचे 3 फलंदाज बाद झाले. लाबुशानेने अँडरसनला थर्डमॅनकडे चौकारासाठी फटकावत कारकिर्दीतील सहावे व ऍशेस मालिकेतील पहिले शतक झळकावले. रॉबिन्सनचा चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात तो पायचीत झाला.

पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत साडेतीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत असलेल्या स्टीव्ह स्मिथचे शतकाच्या उंबरठय़ावर बाद होणे निराशाजनक ठरले. त्याच्या 201 चेंडूतील खेळीत 12 चौकार व 1 षटकाराचा समावेश राहिला.
ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनीही उत्तम फटकेबाजी केली. स्टार्क (नाबाद 39) व नेसर (35) यांची आतषबाजी त्यात महत्त्वाची ठरली. या जोडीने आठव्या गडय़ासाठी अर्धशतकी भागीदारी साकारली. त्यांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने चहापानापर्यंत 7 बाद 390 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यापूर्वी, स्मिथ व ऍलेक्स कॅरे (51) यांनी 6 व्या गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी साकारली. अँडरसनने चहापानापूर्वी सलग षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. स्मिथ बॅक ऍक्रॉस फटका खेळण्याच्या प्रयत्नात पायचीत झाला तर कॅरेने कव्हर्समध्ये सोपा झेल दिला.
झाय रिचर्डसनने ख्रिस वोक्सला (1-103) उत्तुंग षटकारासाठी पिटाळले. पुढे रिचर्डसन नवव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला आणि त्याच क्षणी स्टीव्ह स्मिथने डावाची घोषणा केली.
स्टार्कचा परतीचा कठीण झेल टिपता न आलेल्या बेन स्टोक्सने 113 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवले. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडची प्रारंभी दाणादाण उडाली, ते खळबळजनक ठरले. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर येथे स्वस्तात तंबूत परतले. स्टार्कने रोरी बर्न्सला (4) स्लीपमधील स्मिथकरवी झेलबाद केले तर पदार्पणवीर मायकल नेसरने कसोटी कारकिर्दीतील दुसऱया चेंडूवरच हसीब हमीदला (6) मिडऑनवरील स्टार्ककडे झेल देण्यास भाग पाडले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः मार्कस हॅरिस झे. बटलर, गो. ब्रॉड 3 (28 चेंडू), डेव्हिड वॉर्नर झे. ब्रॉड, गो. स्टोक्स 95 (167 चेंडूत 11 चौकार), मार्नस लाबुशाने पायचीत गो. रॉबिन्सन 103 (305 चेंडूत 8 चौकार), स्टीव्ह स्मिथ पायचीत गो. अँडरसन 93 (201 चेंडूत 12 चौकार, 1 षटकार), ट्रव्हिस हेड त्रि. गो. रुट 18 (36 चेंडूत 3 चौकार), कॅमेरुन ग्रीन त्रि. गो. स्टोक्स 2 (5 चेंडू), ऍलेक्स कॅरे झे. हमीद, गो. अँडरसन 51 (107 चेंडूत 5 चौकार), मिशेल स्टार्क नाबाद 39 (39 चेंडूत 5 चौकार), मायकल नेसर झे. ब्रॉड, गो. स्टोक्स 35 (24 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), झाय रिचर्डसन झे. बटलर, गो. वोक्स 9 (3 चेंडूत 1 षटकार). अवांतर 25. एकूण 150.4 षटकात 9 बाद 473 वर घोषित.
गडी बाद होण्याचा क्रम
1-4 (हॅरिस, 7.3), 2-176 (वॉर्नर, 64.2), 3-241 (लाबुशाने, 97.5), 4-291 (हेड, 110.3), 5-294 (ग्रीन, 111.3), 6-385 (स्मिथ, 138.6), 7-390 (कॅरे, 140.4), 8-448 (नेसर, 149.1), 9-473 (रिचर्डसन, 150.4).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 29-10-58-2, स्टुअर्ट ब्रॉड 26-6-73-1, ख्रिस वोक्स 23.4-6-103-1, ऑलि रॉबिन्सन 27-13-45-1, बेन स्टोक्स 25-2-113-3, जो रुट 20-2-72-1.
इंग्लंड पहिला डाव ः हसीब हमीद झे. स्टार्क, गो. नेसर 6 (21 चेंडू), रोरी बर्न्स झे. स्मिथ, गो. स्टार्क 4 (3 चेंडूत 1 चौकार), डेव्हिड मलान खेळत आहे 1 (19 चेंडू), जो रुट खेळत आहे 5 (9 चेंडू). अवांतर 1. एकूण 8.4 षटकात 2 बाद 17.
गडी बाद होण्याचा क्रम
1-7 (बर्न्स, 2.1), 2-12 (हसीब, 6.2).
गोलंदाजी
मिशेल स्टार्क 3-1-11-1, झाय रिचर्डसन 4-3-1-0, मायकल नेसर 1.4-0-4-1.
कसोटीत सर्वात जलद 2 हजार धावा जमवणारा लाबुशाने चौथा फलंदाज
मार्नस लाबुशानेने यावेळी कसोटीत सर्वात जलद 2 हजार धावांचा टप्पा सर करणाऱया फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान संपादन केले. कसोटी क्रिकेटमधील 144 वर्षांच्या इतिहासात 3068 कसोटीवीरांमध्ये तो जॉर्ज हेडली, हर्बर्ट सटक्लिफ व माईक हसी यांच्यानंतर कमी डावात हा टप्पा सर करणारा चौथा फलंदाज ठरला. ब्रॅडमन यांनी 22 डावात, जमैकन हेडलीने 32 तर सटक्लिफ, हसी यांनी 33 डावात हा पराक्रम गाजवला. लाबुशानेने 34 डावात हा माईलस्टोन सर केला.









