कोरोना काळात व्यवसाय उद्योगांवर विपरित परिणाम झाले. लघू उद्योग आणि उद्योजकांना याची झळ तर मोठय़ा प्रमाणावर बसली. अनेकांचे उद्योग ठप्प झाले तर काहींचे बंदसुद्धा. परिणामी मोठय़ा प्रमाणावर रोजगार गेले. आरोग्यासह रोजी रोटीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाला. आता मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. सकारात्मकतेपाठोपाठ व्यावसायिक स्थैर्य परत येऊ लागले आहे. अशक्मयप्राय वाटणाऱया परिस्थितीतून हे आक्रित साध्य करण्यात व्यवसाय क्षेत्रासह विशेषतः लघू-उद्योगांना लाभलेली तंत्रज्ञानाची साथ व वैयक्तिक जिद्दीसह केलेले सामूहिक प्रयत्न यामुळेच हे शक्मय झाले आहे.
आता वैयक्तिक स्तरावर कामबंदी, टाळेबंदीमुळे नोकरी गमावलेल्या एमबीए मार्केटिंग पात्रताधारक युवतीचेच उदाहरण बघा. ही मुलगी डिजिटल मार्केटिंगसह एमएसएमई क्षेत्रात मार्केटिंगचे काम करीत असे. कोरोनाच्या पहिल्याच टप्प्यात मार्केटिंग एजन्सी बंद झाली व तिच्या नशिबी आली ती अवेळी बेकारी.
पण या युवतीने धीर न सोडता परिस्थितीला सामोरे जाण्याचे ठरविले. तिने आपल्या अनुभवाचा फायदा कोरोनाकाळात विशेष गरज असणाऱया एमएसएमई क्षेत्राच्या ऑनलाईन, डिजिटल मार्केटिंगसाठी करण्याचे ठरविले व त्यानुरुप प्रयत्न सुरू केले. ग्राहकांचे बाहेर जाणे व व्यवहारांवर त्यावेळी कठोर निर्बंध असल्याने डिजिटल मार्केटिंगला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यातून या तरुणीचा उत्साह तर वाढलाच, तिला अल्पावधीतच चांगला फायदा होऊ लागला.
आपले ज्ञान, तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे व्यावसायिक फायदा होऊ शकतो व अकल्पित आलेल्या संकटावर मात करता येते या धारणेतून या तरुणीने ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला व त्यांनी अल्पावधीतच डिजिटल मार्केटिंग करणारी कंपनी कोविडकाळात सुरू तर केलीच, त्याला यशस्वीसुद्धा केले ते मुख्यतः डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारावर!
सर्वसाधारणपणे मध्यम लघू उद्योगांना तंत्रज्ञानाचे पाठबळ नेहमीच फायदेशीर ठरते. कोरोनामुळे हे पुन्हा व नव्याने सिद्ध झाले आहे. बदलत्या क्यावसायिक स्थितीनुरुप या तंत्रज्ञानाचे यश आहे. मात्र त्यामागे उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वा सद्यस्थितीत सर्वच लघू उद्योग माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर करू शकणार नसले तरी त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करणे ही कळाची गरज आहे.
कोरोनाकाळात इतर व्यावसायिक क्षेत्रांप्रमाणेच एमएसएमई क्षेत्राने व्यावसायिक गरज व आपत्तींवर मात कशाप्रकारे केली हे पाहणे पण लक्षणीय ठरते. यामध्ये अर्थातच कमीतकमी खर्च व गुंतवणुकीसह अधिकाधिक व्यावसायिक फायदा व्हावा असा दुहेरी दृष्टीकोन होता.
उदाहरणार्थ दररोजच्या व्यवहार, खतावणीसाठी खाताबुकने परंपरागत हिशोबवहीची जागा घेतली असून हा बदल कोरोनादरम्यान विशेष लाभदायी ठरेल. या आणि यासारख्या ऍपसदृश्य संगणकीय तंत्रज्ञानाचा उपयोग व्यावसायिक नोंदी, आठवणीचे मुद्दे, ग्राहकनिहाय तपशील इ. साठी सुद्धा मोठय़ा प्रमाणात केला जातो.
नव्याने व नव्या संदर्भात सूक्ष्म व लघूउद्योग क्षेत्रातील ज्या उद्योग व उद्योजकांनी मोठय़ा प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामध्ये प्रामुख्याने स्वस्त धान्य दुकाने व उपहारगृहे यासारख्या व्यवसाय क्षेत्रांचा समावेश करावा लागेल. यापैकी स्वस्त धान्य दुकानदारांनी युपीआय वा तत्सम संगणकीय पद्धतीने पैसे घेण्यास सुरुवात केली व उपहारगृहांनी स्विगी, झोमॅटो, यासारख्या व्यवहार पद्धतींचा अवलंब केला. परिणामी जनसामान्यांच्या दैनंदिन खरेदीपैकी मोठय़ा प्रमाणावरील आर्थिक व्यवहार कोरोनाकाळात व आता त्यानंतर पण संगणकीय पद्धतीने व कायमस्वरुपी होऊ लागले ही वस्तुस्थिती आहे.
संगणकीय कार्यपद्धतीचा लघू व मध्यम उद्योगांचा व्यापार व विक्री व्यवहारांनासुद्धा फायदा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील प्रमुख उदाहरण म्हणून संकेतस्थळाचा उल्लेख करावा लागेल. ज्या लघूउद्योगांचे संकेतस्थळ आहे व ते अद्ययावत केलेले असेल तर ग्राहक त्याद्वारे संबंधित कंपनीशी थेट संपर्क साधू शकतात. यातूनच प्रसंगी विक्री व्यवहारांना चालना मिळत असल्याचा अनुभव पण ताजाच आहे.
याशिवाय लघुउद्योग क्षेत्रातील ज्या प्रमुख व्यवसाय क्षेत्रात सध्या संगणकीय तंत्रज्ञानाचा मोठा बोलबाला आहे ते पुढीलप्रमाणे-
माहितीचे संकलन- विश्लेषण- व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती संकलित करून आपल्या व्यावसायिक प्राधान्यानुरुप त्याचा उपयोग करणे सर्व उद्योगांप्रमाणेच लघू उद्योगांनादेखील फायदेशीर ठरते. अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या माहिती विश्लेषणाद्वारे होऊ शकते. या अद्ययावत व तंत्रज्ञानावर आधारित माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे फायदे अधिकाधिक स्पष्ट होत आहेत.
क्लाऊड काँप्युटिंगः संगणकीय पद्धतीवर आधारित क्लाऊड काँप्युटिंग हे तंत्रज्ञान मुलभूत संगणकीय कार्यपद्धती, व्यवसायानुरुप संगणकीय काम व त्यासाठी आवश्यक अशी विकसित संगणकीय शैली याद्वारा उपलब्ध होते. तुलनेने कमी गुंतवणुकीसह हे शक्मय असल्याने त्याचा फायदा करून घेणे लघू उद्योगांना नक्कीच उपयुक्त ठरावे.
एचआर संबंधित कार्यपद्धतीः लघु उद्योगांसाठी मानवी संबंध व्यवस्थापन व त्यानुषंगाने असणाऱया कार्यपद्धती व कागदोपत्री नोंदी महत्त्वाच्या ठरतात. ही कामे मर्यादित स्वरुपातील असली तरी कर्मचारी आणि कायदेविषयकदृष्टय़ा अचूकपणे व वेळेत करणे म्हणूनच व्यवसायासाठी आवश्यक ठरते. लघू उद्योग आणि उद्योजकांसाठी एचआर विषयक धोरणे, पद्धती व नोंदीसाठी संगणकीय तंत्रज्ञान आता सहज आणि सुलभपणे उपलब्ध आहे.
तांत्रिक बुद्धिमत्ताः तंत्रज्ञानावर आधारित व अद्ययावत अशी प्रक्रिया वा सेवाविषयक कार्यपद्धती आता विकसित करण्यात आली असून ती सहजसाध्य आहे. कामाची अचुकता व उत्पादकता हे तांत्रिक बुद्धिमत्तेचे प्रमुख फायदे असल्याचे सिद्ध झाले आहे. याचा फायदा उत्पादन प्रक्रियेला अद्ययावत करणे, ग्राहक संपर्क व विक्री वाढ, संगणकीय व्यवहार विषयक सुरक्षा, कर्मचारी संवाद व प्रशिक्षण, दर्जा विषयक विकास, कार्यपद्धतींचा अवलंब इ. क्षेत्रात लघू उद्योगांना सहजपणे करता येतो.
कोरोनानंतर आता लघू उद्योगांना नव्या संदर्भात उभे राहणे शक्मय झाले आहे. यामागे बदलता काळ आणि गरजांनुरुप केलेला अवलंब व त्यासाठी वेळेत घेतलेली लवचिक व व्यावहारिक भूमिका महत्त्वाची ठरली असून याच पद्धतीने आपल्या मध्यम व लघू उद्योगांचा विकास होऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे.
दत्तात्रय आंबुलकर








