‘शून्य’ गुंतवणुकीची शेती ही कृषी क्षेत्रातील एक अभिनव संकल्पना आहे. या प्रयोगाचा भारतातील प्रारंभ प्रथम महाराष्ट्रात झाला असे मानले जाते. पण आता उत्तर प्रदेशातील महिलांनीही हे तंत्र साध्य केले असून भगवान श्रीकृष्णाच्या ‘ब्रज’भूमीतील महिलांनी याचा यशस्वी प्रयोग केला आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आणंद येथे शून्य गुंतवणुकीच्या शेतीसंबंधी एका परिषदेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात ब्रज येथील महिलांच्या या उपक्रमाचा उल्लेख आणि प्रशंसा करण्यात आली. शेतकऱयांचे उत्पन्न येत्या पाच वर्षांमध्ये दुप्पट करण्याच्या योजनेला या उपक्रमाचा हातभार लागणार आहे.
या प्रकारच्या शेतीमध्ये पहिल्या वर्षी उत्पन्न कमी येते. तथापि नंतर प्रत्येक वर्षी त्यात वाढ होत जाते. उत्तर प्रदेशातील एटा जिल्हय़ातही असे प्रयोग सुरु असून तेथील काही शेतकरी प्रतिहेक्टर 30 क्विंटल गहू घेत आहेत. केवळ गहू नव्हे, तर मूग, ऊस आणि तांदळाचीही लागवड केली जात आहे. या प्रकारच्या शेतीमुळे लागवडींचा खर्च अतिशय कमी येतो. त्यामुळे शेतकऱयाचा नफा वाढतो.
एटा येथील कारागृहातही आता अशा प्रकारची शेती केली जात आहे. या कारागृहाचे अधिकारी यात रस घेत आहेत. त्यांनी अशी शेती करणाऱया शेतकऱयांना आमंत्रण दिले असून कारागृहातील कैद्यांना या शेतीचे प्रशिक्षण देण्याची विनंती त्यांना केली आहे. शून्य गुंतवणुकीची शेती ही नैसर्गिक असून त्यात खताचा किंवा किटनाशकांचा उपयोगही फारसा केला जात नाही. परिणामी खर्च आणखी कमी होतो. भूमीची सुपिकताही टिकून राहते. तसेच धान्याची गुणवत्ता वाढते. अशा प्रकारे ही शेती सर्व दृष्टींनी लाभदायक असल्याचे दिसते.









