प्रतिनिधी / कोल्हापूर
जि.प.च्या बांधकाम विभागांतर्गत कोणाच्या सांगण्यावरून सेवाज्येष्ठता डावलून चार ठिकाणी उपअभियंत्यांची नियुक्ती केली ? हे चुकीचे झाले असून त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करून ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी कार्यकारी अभियंता महेंद्र क्षिरसागर यांना धारेवर धरले. त्यामुळे चूक मान्य करून सेवाज्येष्ठतेनुसार जे अभियंते पदोन्नतीसाठी पात्र आहेत, त्यांची उपअभियंता पदावर नियुक्ती करावी अशी मागणीही इंगवले यांनी केली. या मुद्यावरून अंबरिष घाटगे यांनीही आक्रमक पवित्रा घेत कोणाच्या खुषमस्करीसाठी या नियुक्त्या केल्या असा सवाल केला. यावेळी अध्यक्ष राहूल पाटील यांच्या सूचनेनुसार चुकीची पदोन्नती रद्द करून नियमानुसार कार्यवाही करू अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
सीईओंच्या अभिनंदनाचा ठराव
जलजीवन मिशन अंतर्गत 117 कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानंतर शासनाकडून 30 वर्षाच्या सुधारीत आराखडÎानुसार योजना मंजूर करण्याचे निर्देश प्राप्त झाले. त्यामुळे मंजूर योजना रद्द करून नव्याने प्रस्ताव करावे लागत होते. पण नवीन प्रस्तावासाठी पुन्हा 2 वर्षांचा वेळ जाणार असल्यामुळे प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या योजना रद्द न करता यापुढील योजना 30 वर्षांच्या आराखडÎानुसार कराव्यात अशी मागणी सीईओ चव्हाण यांनी शासनस्तरावर केली. त्यामुळे 15 वर्षांच्या आराखडÎानुसार मंजूर योजनांचे काम सुरु करण्यास शासनाकडून परवानगी मिळाली आहे. याबद्दल सतीश पाटील यांनी सीईओंच्या अभिनंदनाचा ठराव केला.
तर टक्केवारी देणारी माणसे माझ्यासमोर उभा करा
पाणीपुरवठा विभागाकडून योजनांच्या मंजूरीसाठी 2 टक्के कमिशनची मागणी केली जात असल्याचा आरोप करून ज्यांनी ही रक्कम दिली त्यांना आपल्यासमोर उभा करतो असा आरोप राजवर्धन निंबाळकर यांनी केली. यावेळी केवळ बोलू नका, तर टक्केवारी देणारी माणसे आमच्यासमोर उभी करा. सत्य बाहेर येईल अशी स्पष्टोक्ती सीईओ चव्हाण यांनी केली.
पन्हाळा विश्रामगृहाच्या ठेकेदाराला दोन वर्षे मुदतवाढ द्या
जि.प.च्या पन्हाळा येथील विश्रामगृहाचा सध्या करार संपत आला असला तरी कोरोना आणि पन्हाळ्याकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे संबंधित ठेकेदाराचा तोटा झाला आहे. त्यामुळे या ठेकेदारास आणखी दोन वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी प्रियांका पाटील यांनी केली. त्यानुसार ठराव करण्यात आला. कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या शिक्षकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याबाबत शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. पण त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. याची दखल घेत आपल्या स्तरावर हा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही सीईओ चव्हाण यांनी दिली.
बांबवडेतील हायस्कूलमध्ये दारु, गांजा अन् चरस
बांबवडे येथील महात्म गांधी विद्यालयामध्ये रात्रीच्यावेळेस गांजा, चरस, आणि दारुच्या पाटÎा रंगतात. त्यामुळे संबंधित शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विजय बोरगे यांनी केली. शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी चौकशी करण्याची ग्वाही दिली.
स्थल पाहणीची अट घालावी
परजिह्यातील मक्तेदारांनी निविदा भरल्यामुळे कामात तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिह्यातील स्थानिक मक्तेदारांना काम मिळण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये स्थळ पाहणी दाखल्याची अट घालावी, बयाणा रक्कम मुदतबंद ठेव स्वरूपात आकारण्यात यावी आदी मागण्या अरुण इंगवले यांनी केल्या. त्यानुसार सभेमध्ये ठराव करण्यात आले.
सदस्यांच्या स्वनिधीत तीन लाखांची वाढ
जिल्हा परिषद सदस्यांना साडेसात लाखांचा स्वनिधी आहे. त्यामध्ये सुधारीत अर्थसंकल्पामध्ये 5 लाखांनी वाढ करावी अशी आग्रही मागणी अरुण इंगवले यांनी केली. मागणी मान्य न केल्यास अर्थसंकल्पाला मंजूरी दिली जाणार नाही अशी भूमिका इंगवले यांनी घेतली. या मागणीला सर्व सदस्यांनी पाठींबा दर्शविला. त्यामुळे अर्थ सभापती रसिका पाटील यांनी सुरुवातीस दोन लाख वाढ करण्याचे जाहीर केले. पण सर्व सदस्य 5 लाख वाढीव तरतूद करण्यावर ठाम राहिले. अखेरीस स्वनिधीत तीन लाख रूपये वाढ करण्याचे मान्य करून सभापती पाटील यांनी या विषयावर पडदा पाडला.
तरुण भारतच्या बातमीचा घेतला संदर्भ
उपअभियंत्याच्या चुकीच्या नियुक्तीबद्दल शुक्रवारी तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा संदर्भ घेत, त्याचे कात्रण प्रशासनाला दाखवून अरुण इंगवले यांनी बांधकामचे कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांना जाब विचारला.