महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सहा जागांचे निकाल जाहीर झाले त्यापैकी चार जागा जिंकून भाजपाने चौकार मारला तर काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली खरेतर यातील चार जागा समझोत्याने बिनविरोध निवडून आलेल्या पण उर्वरित म्हणजे अकोला व नागपूर या चमत्कार होणार म्हणत असलेल्या दोन विधानपरिषदेच्या जागा भाजपाने महाआघाडीला दणदणीत धोबीपछाड देत जिंकल्यामुळे राज्यात वेगळे वारे वाहत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 105 आमदार निवडून येऊनही सत्ता गेलेल्या भाजपाला या निकालामुळे नवे बळ आले आहे. तर महाआघाडीत संशयाचे वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करताना दिसत आहेत. महाआघाडीचे निर्माते व महागुरु शरद पवार यांनी या निकालावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या निकालाचा अर्थ आणि निकालासाठीचा अर्थ याची चर्चा सुरु झाली आहे. सत्तारुढ व विरोधक एकमेकांवर ा़चिखलफेक करत आहेत. निवडणुकीचा सोयीचा अर्थ घेत शरसंधान करत आहेत. कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की जिंकणारा पक्ष ‘हा सत्याचा लोकशाहीचा विजय’ म्हणत असतो तर पराभूत उमेदवार हा मतदान यंत्राचा घोटाळा, पैशाचा गैरव्यवहार, घोडेबाजार असे म्हणत असतो. आता या प्रतिक्रियांची जनसामान्यांना सवय झाली आहे. पण खरा अर्थ आणि विजयामागचे कारण सर्वाना ज्ञात असते. त्यामागे अर्थकारण असतेच पण आणखीही अनेक गोष्टी असतात. मुख्य म्हणजे या निवडणुकीतील मतदाराला आपले राजकीय दुकान पुढे चालवायचे असते. मताची फुटाफुटी होण्यामागे अनेक कारणे असतात. पण सर्वांत महत्वाचे अर्थकारण आणि वाहते राजकीय वारे हे कारण असते. उभारलेला उमेदवार हा ही महत्वाचा असतो.नेत्याची रणनिती कारणीभूत असते. या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या असल्या तरी त्याचे परिणाम अन्य निवडणुकांवरही होत असतात. ओघानेच मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीवर या निकालांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जानेवारीत देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. भाजपा विरोधी सर्व एकत्र येऊन महाराष्ट्रातील महाआघाडीचा प्रयोग देशपातळीवर करायचा यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपा विरोधी या आघाडीचे नेतृत्व हवे आहे. त्यांनी एकीकडे तृणमूल काँग्रेसचा विस्तार आरंभला आहे. तर दुसरीकडे भाजपा विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांना रणनितीकार प्रशांत किशोर यांचे मार्गदर्शन आहे. काँग्रेस हा देशपातळीवरील मोठा पक्ष आहे. काँग्रेसला भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व राहूल गांधीकडेच हवे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे नेते केजरीवाल हे ही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आप आणि तृणमूल काँग्रेसने गोव्यात एन्ट्री घेतली आहे. भाजपा विरोधाला हे सारे छोटे-छोटे सरसावले असले तरी नेता कोण हा पेच आहे. शरद पवार यासाठी दिल्लीत बैठका मारत आहेत. सर्व विरोधकात एकमत घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार असली तरी ते स्वतः नेते पदासाठी इच्छुक आहेत हे विसरता येणार नाही. काँग्रेस राष्ट्रव्यापी पक्ष असला तरी त्यांचे छोटे-छोटे प्रादेशिक तुकडे होत आहेत आणि अशा काही तुकडय़ांना बरे दिवस येत आहेत हे बघून आगामी काळात काश्मीर, पंजाबसह अन्य काही प्रांतात नाराज काँग्रेसजन स्वतंत्र सुभा उभारण्यावर भर देतील असे दिसते आहे. गंमत म्हणजे एकीकडे भाजपा विरोधी सारे एक अशी भाषा असली तर गोव्यात तृणमूल काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार आपल्या पक्षात घेऊन तेथे राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे. वरवर आम्ही एक असे सर्वच म्हणत असले तरी कोण केव्हा कुणाच्या पाठीत खंजीर खुपसेल याचा कुणालाही भरवसा नाही. निवडणुकीत फायदा होतो हे बघून जात, धर्म यांच्या मतपेटय़ा बळकट केल्या जात आहेत. महाराष्ट्रात मराठा, धनगर, ओबीसी, आरक्षण व अन्य मागण्या घेऊन संघटीत होत आहेत. लोकशाहीत धनदांडगे, जातदांडगे यांचेच चालते हे अधोरेखित झाल्याने लोकशाहीचे भविष्य व लहान घटकांचे भवितव्य यावर प्रश्नचिन्ह आहे. दोन वर्षे कोरोनाचा सर्वांनाच तडाखा बसला अजून कोरोनाचे व पाठोपाठच्या ओमीक्रॉनचे भय संपलेले नाही. महागाई गगनाला भिडली, बेरोजगारी वाढली, उत्पन्न कमी झाले, शेतकऱयांना न्याय नाही. शाळा-शिक्षण याबद्दल न बोललेले बरे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. पवारांचा महाराष्ट्र प्रयोग व तीन पक्षाचे सरकार जनतेच्या इच्छांना उतरताना दिसत नाही. घोटाळे सुरुच आहेत. नगरसेवकांपासून आमदारापर्यंत सर्वाना पुन्हा निवडून येणे ही कसरत आहे आणि म्हणूनच नागपूर असो अकोला असो तेथील विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला. कमिटेंड मतदार फुटले आणि महाआघाडीचे नेते तोंडावर पडले. खरेतर या सहा जागावर बिनविरोध निवडणूक अपेक्षित होती. महाराष्ट्रात तशी परंपरा आहे. यावेळीही ती परंपरा पाळली जाईल असे वाटत होते. चर्चाही तशी होती. कोल्हापूर, मुंबई व धुळे, नंदुरबार येथील निवडणुका बिनविरोध झाल्या. मुंबईची एक जागा भाजपाला, एक जागा शिवसेनेला सोडवण्यात आली. कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली गेली आणि धुळे जागा भाजपाला सोडली. नागपूर व अकोला येथेही समझोता अपेक्षित होता पण तो झाला नाही. महाआघाडीने तेथे वेगळी भूमिका घेतली व उमेदवार बदलून वगैरे सर्व मार्ग व सत्ता वापरुन बघितले पण महाआघाडीचा पराभव झाला. नागपूरमध्ये त्यांची मते फुटली. आता यावर चिंतन सुरु झाले आहे. चिखलफेकही सुरु आहे. राजकारणात कामापेक्षा वादावर आणि सेवेपेक्षा मेव्यावर भर असल्याने सामान्य माणसे राजकारणाला वैतागली आहेत. राजकीय पक्षाचे सोशल मीडिया, पत्रकार परिषदा आणि रोजची बाष्फळ चिखलफेक यामुळे वैतागलेले मतदार योग्यवेळी संबंधितांना जागा दाखवणार आहेत. शरद पवारांना तीन पक्ष एकत्र आले तर आपण जिंकू असे वाटत होते व आहे. त्यांचा हा विश्वास किती सार्थ ठरतो हे हळुहळू दिसेल तूर्त कमिटमेंट असलेले मतदार फुटले हे लक्षात घेतले पाहिजे आणि आगामी राजकारण अधिक सावध, सजगपणे केले पाहिजे. पाच राज्यांच्या निवडणुकांना आता गती येईल. मोदींनी वाराणशीत प्रचाराचा जणू नारळच फोडला. राहूल गांधींनी हिंदूत्व आणि हिंदुत्ववादी असा शब्दच्छल करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. संसदेचे अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्प समोर आहे. अशावेळी राजकारणाच्या पुढे जाऊन समाजकारण, देशकारण महत्वाचे मानले पाहिजे.
Previous Articleलखीमपूर खेरी प्रकरण पूर्वनियोजित
Next Article … अन् जेठालाल थिरकला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








