अलीकडच्या काळात जगभरात भारतीय तरुण-तरुणींचा डंका वाजत आहे. पंजाबमधील चंदिगढची रहिवासी असलेली हरनाज संधू यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ठरली आणि भारतीय सुंदरी केवळ शारीरिक मोजमापातच नव्हे तर बुद्धिमत्तेतही अव्वल असल्याचे त्यामुळे सिद्ध झाले. 2000 साली लारा दत्ताला हा किताब मिळाला होता, त्यानंतर एकवीस वर्षांनंतर 21 वषीय हरनाजने तो मिळवला. सौंदर्याबरोबरच बुद्धी हा स्त्रीचा अलंकार आहे. तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे, आपण आपल्यातील वेगळेपण हेरले पाहिजे, अशा आशयाचे तिचे निवेदन परीक्षक मंडळींना भावले आणि ती ‘मिस युनिव्हर्स’ची मानकरी ठरली. जागतिक हवामान बदलाविषयी तिने दिलेले उत्तरही त्यांच्या पसंतीला उतरले. हा किताब भारतीय तरुणीला सुश्मिता सेन आणि लारा दत्तानंतर तिसऱया वेळेस प्राप्त झाला आहे. ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून हरनाज आलेली आहे, ती पाहता तिने मिळवलेले यश देदिप्यमान असेच आहे. तिची आई डॉक्टर आणि वडील रियल इस्टेटच्या व्यवसायात आहेत. हा किताब मिळवण्यासाठी तिने घोडेस्वारी, जलतरण, नृत्यामध्ये पारंगतता मिळवली होती. पंजाबी चित्रपटात तिने भूमिकाही केल्या आहेत. ‘पाऊं बारा’ आणि ‘बाई जी कुट्टंगे’ हे तिचे प्रादेशिक चित्रपट होत. लोकप्रशासन हा तिचा अभ्यासाचा विषय होता. हरनाजच्या निवडीमुळे पंजाबचे नाव जगभरात पुन्हा एकदा पोहचले आहे. कॅनडामध्ये पंजाबी लोकांची संख्या लक्षणीय आहे. तिथल्या शासकीय, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत पंजाबी व्यक्तींचा टक्का मोठा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये व्यसनाधीनता आणि अवैध व्यवहारांमुळे पंजाबचे नाव चर्चेत होते. ‘उडता पंजाब’ या चित्रपटात त्यावर भाष्य करण्यात आले आहे. अशा स्थितीत या राज्याची प्रतिमादेखील हरनाजमुळे उंचावली आहे. ‘मिस वर्ल्ड’ आणि ‘मिस युनिव्हर्स’सारख्या स्पर्धांच्या आयोजनात अमेरिका आणि युरोपीय देशांचा सहभाग मोठा असतो. यंदा पेराग्वेची नादिया फेरेएरा द्वितीय तर दक्षिण आफ्रिकेची लालेला स्वानी तिसऱया स्थानावर होती. मावळती ‘मिस युनिव्हर्स’ आंद्रिया मेझा हिने हरनाजला मुकुट चढवला, तीदेखील मेक्सीकोची आहे. युरोप-अमेरिकेव्यतिरिक्त अन्य खंडातील तरुणींना अशा स्पर्धांमध्ये मिळत असलेले यश ही कौतुकाची बाब असली तरी ती ठरवून करण्यात आलेली कृती आहे का, हेही डोळसपणे तपासण्याची गरज आहे. हरनाजला मांजर आवडते, त्यामुळे मांजराचा आवाज काढून दाखवण्याची सूचनाही तिला करण्यात आली. तिने मांजराचा आवाज हुबेहुब काढून ‘मिमिक्री’मध्ये आपल्याला गम्य असल्याचे दाखवून दिले. अर्थात, तिची ही चित्रफित जगभर पसरली आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडला. जागतिकीकरणानंतर स्त्रीच्या सौंदर्याला विक्रीमूल्य मोठे असल्याचे लक्षात आले आहे. अगदी दाढीसाठी ब्लेडच्या जाहिरातीमध्येही मॉडेल म्हणून स्त्रीचा वापर केला जातो, हे सगळय़ांना ठाऊक आहे. संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ आहे आणि त्यातील सर्वाधिक शेअर आपल्याकडे असावा, यासाठी वॉरन बफेपासून अनेक मान्यवर उद्योगपती धडपडत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये ‘गूगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ ‘ऍडोब’, ‘आयबीएम’ अशा जागतिक कंपन्यांच्या प्रमुख पदावर भारतीय तरुण विराजमान झाले आहेत. कोरोनोत्तर काळात सगळय़ात मोठी बाजारपेठ भारत आहे. या बाजारपेठेवर कब्जा करण्यासाठी सर्व ते प्रयत्न होत आहेत. चीनच्या खालोखाल भारताची लोकसंख्या आणि अर्थातच ग्राहकसंख्या आहे. त्यात तरुण ग्राहक बहुसंख्य आहेत. भारतीय लोक भावनिक आहेत. नातेसंबंध मानणारे आहेत. त्यांच्या भावनेला हात घातला की व्यवसाय करणे सोपे जाते, हे अनेकदा लक्षात आले आहे. हरनाजच्या निवडीमागे भावनिकतेचा मुद्दाही आहे. ज्या इस्त्राईल देशातील इलाट शहरात हा सोहळा झाला, त्या शहरात भारतीय वंशाचे लोक सर्वाधिक आहेत. त्या सगळय़ांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटला, त्यांनी जल्लोष केला. त्यामागे ‘भारत की बेटी’ विश्वसुंदरी झाली, ही भावनाच प्रबळ होती, यात वाद नाही. ‘मिस युनिव्हर्स’ झाल्यानंतर हरनाजला एक वर्षभर जगभरातील विविध उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. ‘सोशल वर्क’ म्हणून विविध कामे करावी लागतात. त्यासाठी वर्षभर तिला पगारही दिला जातो. वर्षभरानंतर तिच्या जागी दुसऱया व्यक्तीची निवड झाली की तिचा पगार बंद होतो. हरनाजच्या मस्तकावर चढवण्यात आलेल्या हिरेजडित मुकुटाची किंमत पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचे सांगितले जाते. जनतेचे लक्ष वेधून घ्यायचे, त्यासाठी कोणतेही माध्यम वापरायचे आणि आपला हेतू साध्य करायचा असा हा काळ आहे. सगळय़ा भ्रामक समजुती रुढ करण्यासाठी ‘सोशल मीडिया’सह जे जे उपलब्ध होतील ते ‘प्लॅटफॉर्म’ वापरायचे कारस्थान केले जात आहे. तुलनेने गरीब असलेल्या देशातील लोक मोठे होण्यासाठी मेहनत घेत असतात. मग, ‘मिस युनिव्हर्स’ने वापरलेली सौंदर्यप्रसाधने, तिचा पोशाख, ज्वेलरी, पादत्राणे अशा सगळय़ा गोष्टींची माहिती पद्धतशीरपणे पसरवली जाते. त्यांची विक्री वाढते आणि आपापली उत्पादने सहजपणे ग्राहकांच्या घरात पोहचवली जातात. जागतिक पटलावर अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने अफाट पैसा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. क्रिकेटमधील ट्वेंटी ट्वेंटी सारखे सामने असो किंवा जगभरात मोठी प्रेक्षकसंख्या असलेला फुटबॉलसारखा खेळ, लोकप्रियता ‘कॅश’ करण्याचे मनसुबे रचले जातात आणि साध्यही केले जातात. जगावर प्रभाव टाकू शकतील अशा व्यक्ती, क्रीडाप्रकार, ‘मिस युनिव्हर्स’सारख्या स्पर्धा, चित्रपट पुरस्कार यातून संबंधित क्षेत्रातील बाजारपेठा भक्कम केल्या जात आहेत. ‘कार्पोरेट’मधून निर्माण झालेला प्रचंड पैसा आपल्या खजिन्यात भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सौंदर्य स्पर्धेत भारतीय तरुणी जगात अव्वल ठरली याचे कौतूक करताना त्यामागील हालचाली आणि हेतूही ध्यानात घेण्याची गरज आहे. वास्तविक, कवी बा. भ. बोरकरांनी ‘देखणे’पणाचे रहस्य प्रांजळपणात असते असे सांगितले आहे. मात्र, भपकेबाजपणालाच महत्त्व दिले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे.
Previous Articleइंडोनेशियाच्या फ्लोरेसमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप
Next Article पाक दहशतवाद्याला काश्मीरात कंठस्नान
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








