ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधील डोरी डुक येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई सुरू आहे.
सुरनकोटमधील डोरी डुक भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोधमोहिम हाती घेतली. लष्कराचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यावेळी लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या भागात आणखी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता असून, शोधमोहिम सुरू आहे.









