प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाची सेमीस्टर परीक्षादेखील अवैध झाली आहे. त्यामुळे मूल्यांकनातील उणिवामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाला तात्काळ सुरुवात करून विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शैक्षणिक वर्ष वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी करत कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी सोमवारी सुवर्णविधानसौध परिसरात आंदोलन छेडले. दरम्यान राज्य सरकार आणि कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाचा निषेध नोंदविला.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत अभ्यासक्रम विस्कळीत झाला आहे. दरम्यान ऑनलाईन वर्गांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिकतेवर परिणाम झाला. त्यामुळे कायद्याचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा वगळता इतर कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्यास तयार आहेत. त्यामुळे मूल्यांकनातील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरित परिणाम झाला असून कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाने समानतेच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. राज्यातील विविध खासगी आणि सरकारी विद्यापीठांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. त्यानुसारच केएसएलयुनेही विचार करावा आणि पुढील शैक्षणिक वर्ष तात्काळ सुरू करावे, विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ते वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या कायद्याचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांनी केली आहे.









