कोलंबो / वृत्तसंस्था
आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या लंका प्रीमियर लीग (एलपीएल) स्पर्धेत पुनरागमनवीर अँजिलो मॅथ्यूजच्या शानदार खेळीच्या बळावर कोलंबो स्टार्सने गॅले ग्लॅडिएटर्स संघावर 41 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर कोलंबो स्टार्सचा कर्णधार मॅथ्यूजने डावाची सुरुवात करताना 57 चेंडूत 73 धावांची आतषबाजी केली आणि यामुळे कोलंबोने निर्धारित 18 षटकात 7 बाद 162 धावांची मजल मारली. मॅथ्यूजच्या खेळीत 8 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. पावसाचा व्यत्यय आल्याने या लढतीत 2 षटकांची कपात केली गेली.
प्रत्युत्तरात गॅले ग्लॅडिएटर्सचा डाव 16.5 षटकात 121 धावांमध्येच संपुष्टात आला. कोलंबोचा स्टार पेसर नवीन उल-हकने 27 धावात 3 बळी घेतले. ग्लॅडिएटर्सचा हा दोन दिवसांच्या कालावधीत सलग दुसरा पराभव ठरला. कुशल मेंडिसने 39 चेंडूत 7 चौकार व एका षटकारासह 64 धावांची आतषबाजी केली तरी तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. सीक्कुगे प्रसन्नाने 23 धावात 2 तर रवी रामपॉलने 34 धावात 2 बळी घेतले. कोलंबो स्टार्ससाठी हा हंगामातील केवळ दुसरा विजय ठरला.









