एमक्यूएम नेते अल्ताफ हुसैन यांचे आवाहन
वृत्तसंस्था / लंडन
मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे (एमक्यूएम) नेते अल्ताफ हुसैन यांनी संयुक्त राष्ट्रसंघ, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संसद आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे पाकिस्तानच्या कब्जामधून सिंध आणि बलुचिस्तानला मुक्त करविण्याची मागणी केली आहे. या भागांमध्ये पाकिस्तानी सैन्य दशकांपासून अत्याचार करत आहे, लोकांची हत्या केली जात असून कित्येकांना गायब करण्यात आले आहे. हा प्रकार आता सहन करण्यापलिकडे पोहोचला आहे. याचमुळे भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सर्व लोकशाहीवादी देशांसोबत मिळून दोन्ही प्रदेशांना पाकिस्तानच्या कब्जातून मुक्त करावे असे हुसैन यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे सरकार आणि सैन्य दहशतवादी संघटनांसोबत मिळून दोन्ही प्रदेशांमध्ये भयाचे वातावरण कायम ठेवले आहे. तसेच पाकिस्तान शेजारी देशांमध्ये दहशतवादी पाठवून रक्तपात घडवून आणत आहे. पाकिस्तानची ही गैरकृत्ये त्वरित रोखण्याची गरज असल्याचे विधान अल्ताफ यांनी केले आहे. एमक्यूएम नेता दीर्घकाळापासून ब्रिटनमध्ये राहून पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आला आहे.
अल्ताफ यांच्या विरोधात पाकिस्तान सरकारकडून अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात पोहोचलेल्या लोकांचा तेथील सरकारने नेहमीच विश्वासघात केला आहे. अशा लोकांना वेगळे समजून त्यांच्या विरोधात कट रचण्यात आले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा अल्ताफ यांचा आरोप आहे.









