कोल्हापूर जिल्हा दूध कर्मचारी संघटनेचे केंद्राला निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामीण भागातील दूध संस्था तसेच तत्सम संस्थांतील कामगारांना केंद्र शासनाच्या `ईएसआयसी’ योजनेत सहभागी करून घेणेसाठी 10 कामगारांची ही अट रद्द करावी, इच्छेने भाग घेणाऱया कामगारांना यामध्ये सहभागी करून घ्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेने निवेदनद्वारे केद्राकडे केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागतवत कराड यांना निवेदन दिले आहे.
शेतीप्रधान देशात शेतीपूरक व्यवसायात दूध संस्था, सेवा सोसायटी, पतसंस्था, प्रक्रिया उद्योग, छोटे उद्योगात कार्यरत असणारे संबंधित लाखो कर्मचारी शासकीय योजनांपासून वंचीत आहेत. खेडेगावातील गोरगरिबांची अर्थवाहिनी असलेल्या दूध संकलन आणि विक्री व्यवसायातील लाखो असंघटीत कामगार आरोग्य योजनांपासून वंचित आहेत.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटना, कोल्हापूर हि देशातील एक संघटना कार्यरत आहे. या संघटनेमध्ये सुमारे 9 हजार 300 कर्मचारी सभासद आहेत. याबरोबरच दुग्ध व्यवसाय व इतर व्यवसाय यामध्ये कोल्हापूर जिल्हयात सुमारे वीस हजाराच्या वर कर्मचारी ग्रामीण पातळीवर कार्यरत आहेत.
या उद्योगांचे कार्यक्षेत्र हे गाव मर्यादित आहे त्यामुळे कर्मचारी संख्या कधीच वाढू शकत नाही त्यामुळे प्रत्येक योजनेपासून हे कर्मचारी वंचित रहातात. औद्योगिक कामगारांना आधार मिळावा म्हणून कर्मचारी राज्य बिमा निगम ईएसआयसी शासनाने योजना लागू केली आहे. यातून आरोग्याबाबत कामगारांना योग्य सोयी सवलती देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दूध व्यवसायातही या योजनेत कमीत कमी 10 कर्मचारी संख्या आवश्यक आहे. मात्र ही अट ग्रामीण भागातील संस्थांचा विचार करता जाचक आहे. ती बदलण्यात यावी किंवा ज्या दूध संस्था व कर्मचारी स्वतःहून या योजनेत सहभागी व्हायची इच्छा असेल त्यांना यामध्ये स्वेच्छा पद्धतीने सहभागी करून घ्यावे व सदर योजनेची व्याप्ती वाढवावी. दूध व तत्सम संस्थांमध्ये काम करणाऱया कामगारांना योजना लागू व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.
दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे संघटक सुभाष गुरव, प्राव्हीडंट फंड, इएसआयसी सल्लागार कविता शिंदे यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, धेर्यशील माने, संभाजीराजे छत्रपती, संजय मंडलिक यांना भेटून निवेदन दिले तसेच ईएसआयसीचे व्यवस्थापकीय संचालक मुखमीत भाटिया यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.