परिवहनमंत्र्यांचा अल्टीमेटम; कर्मचारी अद्याप संपावर ठाम
प्रतिनिधी / सांगली
एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा महिना झाला संप सुरु आहे. राज्यातील ९६ हजार कर्मचारी संपावर असून, त्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा कारवाई अटळ असल्याचे सांगितले आहे. मात्र एसटी कर्मचारी अद्याप संपावरच ठाम असल्याने, जिल्ह्यातील ५० टक्के एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
एसटी महामंडळ राज्यशासनात विलिनीकरणासाठी आठ नोव्हेंबरपासून संप पुकारण्यात आला आहे. शासनाने दिलेला वेतनवाढीचा निर्णय अमान्य करत सांगली जिल्हयातीलही काही कर्मचारी अजून संपावर ठाम आहेत. सध्या सांगली एसटी विभागात ५० टक्के कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. त्यामुळे सांगली विभागातील ४ हजार २७ कर्मचाऱ्यांपैकी फक्त २००० च्या आसपास कर्मचारी सध्या कामावर उपस्थित आहेत.
संपात सहभागी झाल्याबद्दल प्रशासनाकडून गेले काही दिवस कारवाईचा बडगा उगारला होता. आजअखेर सांगली जिल्ह्यातील ८२३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर आजअखेर ११६ जणांना कामावरुन बडतर्फ केले आहे. एसटीच्या सध्या ३० ते ३५ टक्के फेऱ्या सुरू आहेत. यासाठी ३०० च्या आसपास गाड्यांच्या फेऱ्या होत आहेत. कामावर उपस्थित तर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्याप्रमाणे व प्रवाशांच्या प्रतिसादानंतर फेऱ्या सुरू केल्या जात असल्याची माहिती एसटीच्या सांगली विभागातून देण्यात आली आहे. परंतू ५० टक्के कर्मचारी कामावर नसल्यामुळे उपलब्ध संख्येनुसार निम्म्या गाड्यांच्याच फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. अजूनही ५० टक्के कर्मचारी संपावर ठाम असल्याने या कर्मचाऱ्यांवर प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे