प्रतिनिधी/ पणजी
गोमेकॉतील नोकरभरतीबाबत पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार टोनी रॉड्रीग्स व सांतआद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना शनिवारी गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांची भेट घेऊन नोकरभरतीबाबत शहानिशा केली. गोमेकॉत नोकरीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी केवळ एका विशिष्ट भागातीलच उमेदवारांची निवड न करता गोव्याच्या सर्व भागातील उमेदवारांना सारखा न्याय द्यावा व योग्य उमेदवारांची निवड करावी, असे आवाहन तिन्ही आमदारांनी डीन बांदेकर यांना केले आहे.
गोमेकॉत होणाऱया नोकरभरतीत अधिकाधिक वाळपई व सांखळी परिसरातीलच उमेदवारांची निवड केली जात असल्याची चर्चा समाजमाध्यमातून सुरू आहे. गोवा वैद्यकीय कॉलेज आता सत्तरी वैद्यकीय कॉलेज बनले असल्याचा आरोप केला जात आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही तिन्ही आमदार डीन बांदेकर यांना भेटल्याचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.
दरम्यान, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना संपर्क केला असता त्यांनी आपण संचालकांना भेटण्यासाठी गोमेकॉत गेलो होतो, असे सांगितले. त्यामुळे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा सत्य परिस्थिती उघड करण्यास घाबरतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांताक्रूझ मतदारसंघाचे आमदार टोनी रॉड्रिग्स यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले. गोमेकॉत नोकरभरती असल्यास आरोग्यमंत्री विश्वजित राणे किंवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मर्जीतील उमेदवारींची वर्णी लागते. त्यामुळे गोमेकॉ आता सत्तरी वैद्यकीय महाविद्यालय बनले असल्याचे आरोप केले जात आहेत. अनेक प्रसारमाध्यमांतून तशा प्रकारच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत. डीन बांदेकर यांना भेटण्यासाठी गेलेल्या तिन्ही आमदारांनी प्रसारमाध्यमाशी उघड बोलण्याचे टाळले असले तरी त्यांच्या मर्जीतील उमेदवारांची गोमेकॉत वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून मतदारांना खूश करण्यासाठी सरकारी नोकरी हाच एकमेव जालीम उपाय आहे याची जाणिव सर्वांना झाली आहे.









