केवळ तीन तालुके वगळता सर्वत्र 100 टक्के मतदान : 14 डिसेंबर रोजी लागणार निकाल, मतदान प्रक्रिया शांततेत
प्रतिनिधी /बेळगाव
विधानपरिषदेसाठी निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली. शुक्रवारी मतदान झाले असून जिल्हय़ात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 99.97 टक्के मतदान झाले असून मंगळवार दि. 14 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. जिल्हय़ात दोन जागांसाठी हे मतदान पार पडले असून यामध्ये तिहेरी लढत झाली आहे. मागीलवेळी चार जण प्रबळ उमेदवार होते. तर यावेळी तिहेरी लढत झाली असून आता निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
जिल्हय़ातील निपाणी, चिकोडी-सदलगा, कागवाड, रायबाग, हुक्केरी, मुडलगी, गोकाक, खानापूर, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती या तालुक्यांमध्ये 100 टक्के मतदान झाले आहे. तर अथणी तालुक्मयात 99.87 टक्के, बेळगाव तालुक्मयात 99.91 टक्के, रामदुर्ग 99.83 टक्के मतदान झाले आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी असली तरी सायंकाळच्या सत्रात बहुसंख्य जणांनी मतदान केल्याने ही टक्केवारी मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षाही वाढली आहे. वाढलेल्या टक्केवारीचा लाभ कोणाला मिळणार हे आता मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.
जिल्हय़ात एकूण 8,849 मतदार आहेत. त्यामध्ये 4,211 पुरूष तर 4 हजार 638 महिला मतदार आहेत. यामधील एकूण 8,846 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
यामध्ये 4 हजार 209 पुरूष मतदार तर 4 हजार 637 महिला मतदारांचा समावेश आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली आहे. भाजपचे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष लखन जारकीहोळी यांच्यामध्येच मोठी चुरस निर्माण झाली आहे. या विधान परिषदेसाठी एकूण सहा जण रिंगणात आहेत.
भाजपचे महांतेश कवटगीमठ आणि काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी यांच्यात थेट लढत होती. मात्र अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी यांनी अर्ज दाखल केल्याने मोठी चुरस निर्माण झाली. गेल्या आठ दिवसांपासून या सर्वांनीच प्रचारासाठी कंबर कसली होती. गाठीभेटी घेणे, याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन मतदारांना आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर आता ही निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली असून केवळ दोन महिला मतदार आणि एक पुरूष मतदाराने हक्क बजावला नाही.
बेळगाव शहरात महानगरपालिकेत मतदान केंद्रे उघडण्यात आली होती. याचबरोबर जिल्हय़ातील नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या ठिकाणी देखील मतदान केंदे होती. एकूण 511 मतदान केंद्रांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यात आला आहे. या मतदान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारे नियोजन करण्यात आले होते. बॅलेट पेपरच्या आधारे हे मतदान झाले आहे.
जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार तसेच इतर निवडणूक अधिकाऱयांनी वेगवेगळय़ा मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान केंद्रांबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. बहुतेक ठिकाणी दुपारनंतरच मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदार फिरकले नाहीत. मात्र दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला होता. सकाळी 10 पर्यंत केवळ 7.10 टक्के मतदान झाले होते. तर 12 वाजता 34.91 टक्के झाले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रात मतदान वाढले असून दुपारी 2 वाजता 68.49 टक्के मतदान झाले तर 4.15 वाजता 99.97 टक्के मतदान झाले होते.
यावेळी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच अनेक नगरपंचायतींची व नगरपालिकांची मुदत संपल्यामुळे अनेक जण या निवडणुकीपासून वंचित राहिले. तर काही ग्रामपंचायतींची निवडणूकही झाली नसल्याने त्या ग्रामपंचायतींचे सदस्यही या निवडणुकीत भाग घेऊ शकले नाहीत.
विधानपरिषेदच्या दोन जागांसाठी शुक्रवारी शांततेत व चुरशीने मतदान झाले आहे. आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेटय़ा चिकोडी येथील स्टाँगरुममध्ये ठेवण्यात आल्या असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
येळ्ळूर ग्रा.पं.मध्ये एक मत कमी
बेळगाव तालुक्मयातही 100 टक्के मतदान झाले असते. मात्र येळ्ळूर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश कानशिडे यांचे निधन झाल्याने ती जागा रिक्त आहे. त्यामुळे त्यांचे एक मत कमी झाले. येळ्ळूर ग्रामपंचायतमध्ये एकूण 30 सदस्य होते. त्यामधील 29 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बेळगाव तालुक्मयात इतर ग्राम पंचायतींमध्ये 100 टक्के मतदान झाले आहे.
जिल्हय़ामध्ये विधानपरिषदेसाठी एकूण मतदार आणि मतदानाचा हक्क बजावलेले मतदार
तालुका | एकूण पुरूष मतदार | एकूण महिला मतदार | एकूण | हक्क बजावलेले पुरूष मतदार | हक्क बजावलेल्या महिला मतदार | एकूण झालेले मतदान | टक्केवारी |
निपाणी | 257 | 277 | 534 | 257 | 577 | 534 | 100 |
चिकोडी-सदलगा | 348 | 370 | 718 | 348 | 370 | 718 | 100 |
अथणी | 375 | 422 | 797 | 337 | 422 | 796 | 99.87 |
कागवाड | 94 | 108 | 202 | 94 | 108 | 202 | 100 |
रायबाग | 349 | 382 | 731 | 349 | 382 | 731 | 100 |
हुक्केरी | 449 | 482 | 931 | 449 | 482 | 931 | 100 |
मुडलगी | 179 | 189 | 368 | 179 | 189 | 368 | 100 |
गोकाक | 323 | 361 | 684 | 323 | 361 | 684 | 100 |
बेळगाव | 526 | 570 | 1096 | 525 | 570 | 1095 | 99.91 |
खानापूर | 295 | 347 | 642 | 295 | 347 | 642 | 100 |
कित्तूर | 112 | 121 | 233 | 122 | 121 | 233 | 100 |
बैलहेंगल | 270 | 301 | 571 | 270 | 301 | 571 | 100 |
सौंदत्ती | 359 | 394 | 753 | 359 | 394 | 753 | 100 |
रामदुर्ग | 275 | 314 | 589 | 275 | 313 | 588 | 99.83 |
एकूण | 4211 | 4638 | 8849 | 4209 | 4637 | 8846 | 99.97 |