नातेवाईकांच्या भावना दुखावल्या : मनपा कर्मचाऱयांच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप : जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर स्मशानभूमीतील कामकाजाबद्दल नेहमीच तक्रारी होत असतात. येथील अंत्यविधीपूर्वीच ठेवण्यात आलेल्या लाकडांच्या मुद्दय़ावरून कर्मचाऱयांवर टीका होत असते. मात्र आता अंत्यविधीची नोंद व्यवस्थित ठेवली नसल्याने राख भरतेवेळी गोंधळ झाल्याचा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला. त्यामुळे मनपा कर्मचाऱयांच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
अंत्यविधी केल्यानंतर त्याची नोंद व्यवस्थित ठेवली नसल्याने राख भरताना गोंधळ झाल्याचा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला आहे. भातकांडे गल्ली येथील व्यक्तीचा अंत्यविधी तीन क्रमांकाच्या चौथऱयावर करण्यात आला होता. तर आणखी एका वृद्ध महिलेचा अंत्यविधी काहीवेळानंतर 4 क्रमांकाच्या चौथऱयावर करण्यात आला होता. मात्र याची नोंद करण्यात आली नाही. महापालिकेच्या कर्मचाऱयांनीही याबाबत नोंद घेतली नाही. पण गुरुवारी सकाळी वृद्ध महिलेच्या नातेवाईकांनी 3 क्रमांकाच्या चौथऱयावरील राख भरली. राख भरण्याच्या विधीची तयारी सुरू असतानाच भातकांडे गल्लीतील मयत व्यक्तीचे नातेवाईक राख भरण्यासाठी पोहोचले.
त्यावेळी अन्य नागरिक राख भरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांना विचारले असता महिलेचा अंत्यविधी केल्याचे सांगण्यात आले. पण 3 क्रमांकाच्या चौथऱयावर भातकांडे गल्लीतील मृत क्यक्तीचा अंत्यविधी केला असल्याचे सांगून याबाबतची नोंद महापालिकेच्या कर्मचाऱयांकडे केली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले. तर महापालिकेच्या कर्मचाऱयांनी अंत्यविधीची नोंद करवून घेतली नसल्याने आणि नागरिकांनीही कर्मचाऱयांकडे नोंद केली नसल्याने राख भरताना गोंधळ झाल्याने नातेवाईकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे सदाशिवनगर स्मशानभूमीतील कर्मचाऱयांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळावी, अशी मागणी होत आहे.
अंत्यविधीसाठी लागणारा लाकडाचा खर्च डोईजड…
शहरातील नागरिक अंत्यविधीसाठी सदाशिवनगर स्मशानभूमीचा आधार घेतात. त्यामुळे दररोज या ठिकाणी आठ ते दहा अंत्यविधी होत असतात. स्मशानभूमीची देखभाल व अंत्यविधीच्या नोंदीची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱयांवर आहे. त्यामुळे ही जबाबदारी काहीवेळा व्यवस्थित पार पाडली नसल्याच्या तक्रारी होत असतात. अंत्यविधीपूर्वी स्मशानभूमीत चौथऱयाच्या ठिकाणी लाकडे टाकण्यात येतात. नागरिकांनी स्वतः लाकडे आणण्याचा प्रयत्न केल्यास विरोध केला जातो. याबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. लाकडाच्या वजन व दरामध्ये तफावत असल्याने नागरिक स्वतः अड्डय़ातून लाकडे आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्याला आक्षेप घेतला जातो. अंत्यविधीवेळी वाद नको, असे म्हणून नागरिक निघून जातात. पण अलीकडे हा प्रकार वाढत चालला आहे. गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणारा खर्च डोईजड होत आहे, असे प्रकार घडत आहेत.