प्रा. आनंद मेणसे यांचे प्रतिपादन : अशोक याळगी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान
प्रतिनिधी /बेळगाव
1857 च्या स्वातंत्र्य लढय़ात इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा देशात झाला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वीही देशात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते. ब्रिटिशांनी सत्ता हातात येताच सत्तेची सूत्रे ईस्ट इंडिया कंपनीकडे दिली. दरम्यान एक महत्त्वाचा निर्णय घेऊन देश निःशस्त्र करून टाकला. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील इतिहासात बेळगावातील अधिवेशन देखील महत्त्वाचे आहे, असे उद्गार प्रा. आनंद मेणसे यांनी काढले.
अनगोळ रोड, भाग्यनगर येथील लोकमान्य ग्रंथालयात शुक्रवारी अशोक याळगी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे, किशोर काकडे उपस्थित होते. प्रारंभी अशोक याळगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जगदीश कुंटे यांनी अशोक याळगी यांना लोकमान्य ग्रंथालय, तरुण भारत, वरेरकर नाटय़ संघातर्फे श्रद्धांजली वाहिली. तसेच हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराचे चिफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाले. याबद्दल मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रा. आनंद मेणसे म्हणाले, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने देशात आपला वसाहतवाद रुजविला. नंतरच्या काळात दादाभाई नौरोजींनी डोळे उघडण्याचे काम केले होते. तोपर्यंत भारतीयांचे शोषण करून संपत्ती पळविली होती.
दरम्यान पुढे टिळक, रानडे इतर समाज सुधारकांनी कार्य सुरू केले. टिळकांनी 1916 साली मुस्लीम लोक स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हावे या उद्देशाने मुस्लीम लिगबरोबर करार केला. दरम्यान फाळणीची बिजे देखील रोवली गेली होती. पुढे कामगार वर्गाने आपले हक्क मागावेत आणि संघटित व्हावे, याकरिता कामगार संघटनेला सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला याळगी कुटुंबीय व रसिक श्रोते उपस्थित होते.









