मगो-तृणमूल काँग्रेसची युती अनैसर्गिक : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची टीका
प्रतिनिधी /पणजी
मगोप आणि तृणमूल काँग्रेस यांची युती अनैसर्गिक असून ती जनतेला पसंत नसल्याचा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे. भाजप उमेदवार पळवतो हा मगोचा आरोप चुकीचा असून मगोला उमेदवारच टिकवता येत नाहीत. भाजपकडे अनेक उमेदवार असून मगोचे उमेदवार पळविण्याची भाजपला गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि त्या आरोपांचे खंडन करून ते फेटाळून लावले. मगो पक्ष म्हणजे ढवळीकर ब्रदर्स प्रा. लि. झाल्याचा टोमणाही त्यांनी मारला.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच जर उमेदवार मगोला सांभाळता येत नसतील तर निवडणुकीनंतर कसे सांभाळणार? असा सवाल त्यांनी केला.
मगोने स्वतःची मतेही गमावली
मगोप-तृणमूल काँग्रेस युतीमुळे मगोचे उमेदवार तसेच मतदारही सैरभैर झाले असून मगोची मते भाजपाकडे वळणार या भीतीने मगोचे उमेदवार चिंताग्रस्त बनले आहेत. या युतीला जनतेचे समर्थन नाही. असलेली मतेही सदर युतीमुळे मगो पक्ष गमावून बसल्याची टीकाही तानावडे यांनी केली. मगोचे उमेदवार जर कोण पळवत असतील आणि तशी भीती मगो पक्षाला वाटत असेल तर त्या पक्षाने उमेदवारांना कुलूपात बंद करून ठेवावे, असा सल्लाही तानावडे यांनी दिला.
तृणमूलचे प्रकार त्यांच्यावरच बुमरँग होणार
गोव्यात ममता बॅनर्जींचे मोठमोठे पोस्टर-बॅनर लावले म्हणजे मते मिळतील, तसेच प. बंगालमधून भाडोत्री कार्यकर्ते आणले म्हणजे गर्दी जमवता येईल या भ्रमात तृणमूल काँग्रेसने राहू नये. हे प्रकार त्यांच्यावरच बूमरँग होतील, असे निवेदन तानावडे यांनी केले.
तृणमूलने भाजप, हिदुंवर अत्त्याचार केले
तृणमूल काँग्रेस पक्षाने बंगालमधील भाजप कार्यकर्ते व इतरांवर प्रामुख्याने हिंदुंवर अत्याचार-अन्याय केल्याचे तानावडे म्हणाले. त्याच्या सीडीदेखील त्यांनी पत्रकारांसमोर प्रसारित केल्या. सर्व 40 मतदारसंघात भाजपचे काम असून उमेदवारांची नावे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच घोषित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.









