महिनाभरात सात गुरांवर हल्ला, लोकवस्तीतही वावर, बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
खुटवळ हळर्ण परिसरात बिबटय़ा वाघाचा वावर वाढला असून सर्वसामान्य लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वारंवार वनखात्याला कळविले असले तरी अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्याभरात बिबटय़ा वाघाने भरलोकवस्तीतील तब्बल सात गुरांचा तसेच 15 हून अधिक कुत्र्यांचा फडशा पाडल्याची माहिती नागरिकांनी दिली
आतापर्यंत हा बिबटय़ा वाघ लोकवस्तीत येऊन जनावरांवर हल्ला करीत आहे. कालांतराने याच वाघाने माणसावर हल्ला करायला सुरुवात केल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत.
गेल्या महिनाभरात विरेंद्र परब, चंद्रकांत गावकर, सदानंद शिरोडकर, दीपक केरकर, फोंडू सावंत, अंकूश नाईक, व दिलीप हरीजन यांच्या घरा शेजारी बांधलेल्या गुरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. याबाबत नुकसानग्रस्त लोकांनी वन खात्याच्या कर्मचाऱयांना कळविले मात्र वन खात्याचे कर्मचारी आपली जबाबदारी सर्वसामान्य लोकांवर लादत असल्याने लोक नाराजी व्यक्त करीत आहेत.
एखादी घटना घडल्यानंतर वनखात्याला कळविले की वनखात्याच्या कर्मचाऱयांनी जनावरांच्या डॉक्टरला आणून सर्वांच्या समक्ष पंचनाम करणे जरूरीचे असते, मात्र तसे न करता वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी येतात व ज्या जनावरावर वाघाने हल्ला केलेल्या जनावरालाच डॉक्टरला आणायला सागंतात. त्यामुळे आधीच नुकसानीत असलेल्या व्यक्तीला आणखी नुकसानीत घालण्याचे काम वन खात्याचे कर्मचीर करीत असल्याच दिसून येत आहे. वनखात्याचे कर्मचारी एक प्रकारे सर्व सामान्य लोकांची सतावणूक करीत असल्याचे दिसून येत आहे.
सांगव नदीवरील पूल खुला झाल्यापासून इब्रामपूर हळर्णमार्गे वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वनखात्याने या बिबटय़ा वाघाचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील लोकांनी केली आहे.









