भारताचे प्रथम सेनाप्रमुख जनरल बिपिन लक्ष्मणसिंग रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेला मृत्यू दुःखद आणि धक्कादायक आहे. एमआय श्रेणीच्या जगातील सर्वात सुरक्षित हेलिकॉप्टर्सपैकी एक मानल्या जाणाऱया हेलिकॉप्टरला असा अपघात होणे, अनाकलनीय आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय सेनेला नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱया एका सेनानीचा अंत झाला. बिपिन रावत यांनी भारताच्या प्रथम भूसेनेचे आणि नंतर तिन्ही सेनादलांचे प्रमुख या नात्याने काम करताना अनेक जटील आव्हानांशी निधडय़ा छातीने दोन हात केले. पाकिस्तान आणि चीन या आपल्या दोन्ही कुरापतखोर शेजारी देशांच्या दबावाला त्यांनी समर्थपणे प्रत्युत्तर दिले. भारतीय सेनेसंबंधी भारतीय जनतेच्या मनात असलेला विश्वास त्यांनी अधिकच वृद्धिंगत केला. पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट येथील वायुहल्ला आणि फुटीरताविरोधी कारवाया इत्यादींमध्ये त्यांनी अग्रभागी राहून योगदान दिले. सेनादलांच्या अत्याधुनिकीकरणाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्याचप्रमाणे विदेशी शस्त्रांवरचे भारतीय सेनादलांचे अवलंबित्व कमी व्हावे, देशातच शस्त्रास्त्रांची जास्तीत जास्त निर्मिती व्हावी आणि शस्त्रास्त्रांच्या संदर्भात देश स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी अतिशय गंभीरपणे प्रयत्न केले. याकामी त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांना मनापासून पाठिंबा दिला आणि सहकार्य केले. सामरिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व आणि या तंत्रज्ञानाच्या विकासाची नितांत आवश्यकता यांची त्यांना चांगलीच जाण होती. शस्त्रखरेदीला लागलेली मध्यस्थांची आणि दलालीची कीड संपविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात भारतात स्वदेशी शस्त्रनिर्मितीचे प्रमाण वाढले आहे. नव्या सामरिक सामग्री तंत्रज्ञानाचा विकास देशातच व्हावा यासाठीही ते आग्रही होते. केंद्र सरकारने शस्त्रनिर्मितीत खासगी क्षेत्राला वाव देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणाचेही त्यांनी समर्थन पेले होते. एकंदर, त्यांच्या कार्यकाळात भारतीय सेना दलांचा कायापालट होण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ झाला असताना, त्यांचा असा मृत्यू व्हावा, हे खरोखरच दुर्दैव आहे. ही पोकळी सहजासहजी भरुन निघणार नाही. या दुर्घटनेचे अन्वेषण करण्यासाठी आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जाईल आणि सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, या घटनेतून काही प्रश्न निश्चितपणे निर्माण होतात. एमआय श्रेणीतील हेलिकॉप्टर्स हा भारतीय वायुसेना आणि भूसेनेचाही आधारस्तंभ आहे. ही रशियन बनावटीची हेलिकॉप्टर्स एखाद्या भक्कम गडाप्रमाणे अभेद्य आहेत. तसेच ती उडण्यासाठी सर्वात सुरक्षित आहेत, असे मानले जाते. तरीही असे व्हावे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. त्यामुळे या घटनेची अतिशय बारकाईने आणि सांगोपांग चौकशी होणे आवश्यक आहे. वायुदलाची हेलिकॉप्टर्स आणि विमाने पडण्याच्या घटना नव्या नव्हेत. जुन्या काळातील विमानांचा आजही उपयोग आपली वायुसेना करत असते. आधुनिक विमानांची आणि हेलिकॉप्टर्सची कमतरता वायुसेनेला नेहमीच भासते. जुनी विमाने किंवा हेलिकॉप्टर्समध्ये तांत्रिक समस्या उद्भवणे शक्य असते आणि त्यामुळे ती अपघातग्रस्त होतात असे सांगितले जाते. तथापि, एमआय श्रेणीतील व्ही 17 प्रकारची हेलिकॉप्टर्स तर अत्याधुनिक असून ती भारतीय वायुदलात अवघ्या 9 वर्षांपूर्वी (2012 मध्ये) समाविष्ट झाली आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये या हेलिकॉप्टर्सच्या अपघातांच्या तीन घटना घडल्या असून ही बाब चिंताजनक आहे. सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱया आणि वायुदलाची भिस्त ज्यांवर आहे, अशा हेलिकॉप्टर्सना असे अपघात का होतात यावर संशोधन होणे आवश्यक आहे. कारगिल युद्धापासून सेनादलांच्या अनेक कार्यांमध्ये या हेलिकॉप्टर्सनी निर्णायक भूमिका बजावली आहे, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही, हे खरे असले तरी अशा दुर्घटना घडत राहणेही योग्य नाही. लवकरात लवकर त्यांच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे. अन्यथा अशी अपरिमित हानी होत राहील. एक तोलामोलाचा सैनिक किंवा अधिकारी तयार करणे हे अतिशय कष्टाचे आणि खर्चाचेही काम असते. त्याचा अशा प्रकारे अपमृत्यू घडल्यास ती केवळ त्याच्या कुटुंबाची किंवा हितचिंतकांची नव्हे, तर संपूर्ण देशाचीच हानी असते. त्यामुळे यापुढच्या काळात तरी अशा दुर्घटना कमीत कमी घडाव्यात याची दक्षता घेणे अनिवार्य ठरणार आहे. जनरल बिपिन रावत यांचा मृत्यु अपघातीच आहे, असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी चौकशी सर्व अंगांनी आणि सर्व शक्यता गृहित धरुन केली जाईल, यात शंका नाही. या दुर्घटनेत काही गूढ दडलेले असेल तर तेही उघड व्हावे, अशी सर्वसामान्य भारतीयांची अपेक्षा आहे. अशी काही संवेदनशील घटना घडली, की सोशल मिडियावरुन बऱयाच उलटसुलट चर्चा सुरु होतात. अफवांचेही पीक अमाप येते. बनावट आणि ‘मॉर्फड्’ व्हिडीओ प्रसारित होतात. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा घटनांचे राजकारणही हेतुपुरस्सर केले जाते. काही राष्ट्रविघातक, देशद्रोही आणि विघ्नसंतोषी लोक अशा घटनांनंतर सोशल मिडियावरुन विकृत आनंदही व्यक्त करताना आढळतात. अशा सडलेल्या मनोवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांना कठोरातील कठोर शिक्षाही करण्याची आवश्यकता असते. कारण अशा प्रवृत्ती वेळीच आणि जागीच ठेचल्या नाहीत, तर पुढे त्या वाढून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. तसेच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. तेव्हा संबंधित यंत्रणांनी त्यांचा शोध घेऊन या प्रवृत्तींना संपविणे आवश्यक आहे. जनरल रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता नवे सेनाप्रमुख (सीडीएस) कोण याविषयी चर्चा सुरु आहे. रावत यांचे सैन्याच्या अत्याधुनिकीकरणाचे कार्य आणि शस्त्रास्त्रनिर्मितीत देशाला स्वयंपूर्ण बनविण्याचा त्यांचा ध्यास नवे सेनाप्रमुख तशाच उत्साहात आणि धडाक्यात पुढे नेतील असा विश्वास निश्चितच समस्त भारतीय नागरिकांच्या मनात आहे.
Previous Articleसोनाली आणि तेजस्विनीने पुसली लिपस्टिक
Next Article अभ्यास म्हणजे पुनः पुन्हा एखादी गोष्ट करणे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








