प्रतिनिधी/ चिपळूण
ओमिक्रोनच्या माध्यमातून कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने जिल्हय़ाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असतानाच कामथे उपजिल्हा रूग्णालयातील लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट (एलएमओ)च्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. दीड महिनयात या प्लांटचे केवळ तीनच खांब उभे राहिले आहेत. यातून तिसऱया लाटेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे.
जिल्हय़ात गेल्या 2 वर्षांत कोरोनामुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असतानाच सध्या ओमिक्रोनचे संकट घोंघावू लागले आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱया लाटेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. यातूनच कामथे येथे सुमारे 37 डय़ुरा सिलिंडर सामावतील एवढी 10 किलो लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. मात्र दीड महिन्यात केवळ तीन खांब उभारण्यापलिकडे याची प्रगती झालेली नाही.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीत कामथे उपजिल्हा रुग्णालयाने खूप महत्वाची भूमिका बजावत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रूग्णालयात सुसज्ज अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत ऑक्सिजनची गरज वाढल्याने ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. 7 महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या सौजन्याने डय़ुरा स्नालिंडर ऑक्सिजन प्रणाली रुग्णालयात उभारण्यात आली. मात्र मध्यंतरीच्या काळात ऑक्सिजन सिलिंडर पुरवठय़ात अडचणी निर्माण झाल्याने गोंधळ उडाला होता. शिवाय शासनाने आक्सिजन खरेदीची बिले थकवल्याच्याही घटना घडल्या होत्या.
सध्या कामथे रुग्णालयात केवळ एक कोरोना रूग्ण उपचार घेत आहे. रूग्णालयात 135 बेड उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना रुग्णांसाठी त्यापैकी 50 बेड उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. नवीन प्लॅंटमुळे ऑक्सिजन साठवणुकीची चिंता मिटणार आहे. या प्लॅन्टमुळे सुमारे 37 डय़ुरा सिलिंडर बसतील एवढी टँक उभारली जाणार आहे. हॉस्पिटलमधील 130 बेडवरील रूग्णांना एकाच वेळी ऑक्सिजन वापरला तरी दहा दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा या टँकमध्ये शक्य आहे. त्यामुळे ऑक्सिजन साठवणुकीची चिंता मिटणार असून ऑक्सिजन सिलिंडरवरील वाहतुकीचा खर्चही वाचणार आहे. मात्र त्याची उभारणी कधी पूर्ण होणार, या बाबत प्रश्नचिन्ह उभे आहे.









