प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ताब्यात घेण्यात आल़ा या ट्रकमध्ये सुमारे 253 गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळले तर ट्रकसह एकूण सुमारे 25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल़ा तसेच वाहतूक करणाऱया ट्रकचालकाविरूद्ध उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा
गोविंद जयराम वराडकर (32, ऱा कुडाळ, सिंधुदुर्ग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े मंगळवारी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल़ी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी होणाऱया ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुका व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आह़े त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय बातमी उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होत़ी हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाकडून गस्त घालण्यात येत असतानाच तेथील एका प्रसिद्ध धाब्यासमोर आयशर ट्रक (एमएच 07 एस 1872) उभा असल्याचे दिसून आल़े राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या ट्रकची झाडाझडती घेण्यात आली असता अवैध गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळल़े
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आयशर ट्रकचालक गोविंद वराडकर याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ), (ई) 81,83 व 90 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा तसेच त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीचे अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण विभागाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, कालेकर यांनी केल़ी









