नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचे देशात सध्या 28 रुग्ण आढळून आले असले तरी सर्वांची लक्षणे सौम्य आहेत, असे विविध राज्यांमधील वैद्यकीय अधिकाऱयांनी प्रतिपादन केले आहे. या रुग्णांची चवीची आणि वासाची जाणीव गमावली गेलेली नाही. तसेच कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. मात्र संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेणे अत्यावश्कय आहे, असे तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्यांमाध्ये आढळले आहेत. त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची बारकाईने तपासणी सुरु आहे. अद्यापतरी कोणालाही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. हा नवा विषाणू डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरतो असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसे असले तरी त्याची लक्षणे सौम्य असल्यास फारसा धोका संभवत नाही. आतापर्यंत सर्वांची लक्षणे नियंत्रणात असल्याचे दिसलेले आहे.
तरीही दक्षता आवश्यकच
ओमिक्रॉनची लक्षणे अद्याप सौम्य असली तरी, सर्व नागरीकांनी आपल्याला याचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेणे अनिवार्य आहे. ओमिक्रॉनची पूर्ण माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याचे जिनोम सिक्वेन्सिंग अधिक प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. त्याचे नेमके स्वरुप आणि हानी करण्याची क्षमता यांचा पूर्ण अभ्यास होईपर्यंत दक्षता घेणे आवश्यक आहे. सदैव मास्कचा उपयोग, शक्य तितके सामाजिक अंतर राखणे आणि सॅनिटायझरचा उपयोग करणे सर्वांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे कोणताही बेसावधपणा न दाखविता कसोशीने नियमांचे पालन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले गेले.
कोव्हीशिल्डचे उत्पादन घटविणार
केंद्र सरकारकडून नवी मागणी नसल्याने कोव्हीशिल्ड या कोरोना विरोधातील लसीचे उत्पादन निम्म्यावर आणले जाणार आहे, असे पुण्यातील सिरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील 120 कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. तर सज्ञान वयाच्या किमान निम्म्या लोकांना दोन डोस दिले गेले असून त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अनेक राज्यांकडे लसी पडून
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये कोरोनाच्या लसींचे किमान 11 कोटी डोस पडून आहेत अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. सर्व राज्यांमध्ये मिळून अद्याप किमान 23 कोटी डोस उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेश 2.9 कोटी, पश्चिम बंगाल 2.5 कोटी, महाराष्ट्र 2.2 कोटी, बिहार 1.80 कोटी, राजस्थान 1.43 कोटी, तामिळनाडू 1.35 कोटी आणि मध्यप्रदेश 1.1 कोटी अशा लसी उपलब्ध आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असून तेथे अद्याप 3.5 कोटी लोकांनी एक डोसही घेतलेला नाही. बिहारमध्ये 1.89 कोटी, महाराष्ट्र 1.71 कोटी आणि तामिळनाडू 1.24 कोटी अशी इतर राज्यांमधील संख्या आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.









