शाहुवाडी / प्रतिनिधी
मलकापूर ता.शाहूवाडी येथील वयोवृध्द महिला मंगल ज्ञानदेव कुंभार वय ५२ या महिलेस लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीतून घेवून जावून जबरदस्तीने तिचे दागिने चोरून घेवून गेलेल्या परजिल्ह्यातील आरोपी सलमान मुबारक खान तांबोळी वय २९ व त्यांची पत्नी आयेशा सलमान मुबारक वय २४ दोघे ही रा. शिवजल सिटी,नाईक बोमवाडी ता.फलटण जि.सातारा मुळगाव भवानीनगर विटा ता खानापूर जि.सांगली या दांपत्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून चारचाकी गाडीसह ३ लाख ११ हजार ६५० रूपयेचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की,१६ नोव्हेंबर रोजी रोजी पेरीड नाका, मलकापूर येथून मंगल कुंभार या वयोवृध्द महिलेस लिफ्ट देणेच्या बहान्याने अनोळखी महिला व पुरुष यांनी त्यांच्याकडील चार चाकी गाडीत बसवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देवून त्यांचे कडील सोन्याची बोरमाळ,झुबे,वेल,अंगठी असे दागिने व मोबाईल काढून घेवून त्या महिलेस केर्ली फाटा, जोतिबा रोड येथे सोडून निघून गेले होते. याबाबत शाहूवाडी पोलिसांत अज्ञात पुरूष व महिलेविरूध्द गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस समांतर तपास करीत असताना सलमान तांबोळी व त्याची पत्नी आयेशा तांबोळी हे दोघे आयेशा तांबोळीचे वडील जमिर बाबासाहेब पठाण, रा.मणेर मळा, उचगाव, ता.करवीर यांच्या घरी घरी येणार असल्याची गोपनीय माहिती खब-याकडून मिळाली. ७ डिसेंबर रोजी गुन्हा अन्वेषण पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सलमान व आयेशास ताब्यात घेतले.
पथकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सलमान व आयेशास ताब्यात घेतले. त्या दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. जबरदस्तीने काढून घेतलेले सोन्याचे दागिने व गुन्हाकामी वापरलेली इटॉस कार असा मिळून ३११६५० रूपयेचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपी दांपत्यास पुढील तपासकामी शाहुवाडी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. या कामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार असिफ क्लायगार, सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, अनिल जाधव, वैशाली पाटील, रणजीत पाटील, संतोष पाटील, अमर वासुदेव व सुरेश राठोड आदींनी परिश्रम घेतले.









