बागलकोट संघाला नमवले, मुलांच्या विभागात उपजेतेपद, संध्या चौगुले, रोहित चौगुले अष्टपैलू खेळाडू

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे खोखो फेडरेशन ऑफ कर्नाटक आयोजित सीएम चषक निमंत्रितांच्या खोखो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट संघाचा 1 डाव व 2 गुणांनी पराभव करून सीएम चषक पटकाविला. मुलांच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाला बागलकोट संघाकडून 6 गुणांनी पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या उपांत्य सामन्यात बेळगाव संघाने कोलार जिल्हा संघाचा 5 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बागलकोट जिल्हा संघाचा 1 डाव व 2 गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. या सामन्यात बेळगावच्या पहिल्या निकीता कुटे, संध्या चौगुले व राधिका पवार यांनी पहिली 5 मिनिटे विना गडी गमविता धावल्याने बागलकोट संघ बॅकफूटवर गेला.
या सामन्यात बेळगाव जिल्हय़ाने बागलकोट संघाचे 11 तर बागलकोटने बेळगावचे 6 गडी टिपले. या सामन्यात संध्या चौगुलेला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले तर निकिता कुटे, प्रणाली बिजगरकर व श्रेया मायण्णा यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. या विजयानंतर अनेक वर्षे खंडित पडलेल्या महिलांचे विजेतेपद पुन्हा एकदा बेळगावने खेचून आणले. शामला पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी खोखोमध्ये बेळगावचा दबदबा ठेवला होता. त्यानंतर आता बेळगाव जिल्हा संघाने आपला ठसा उमटवला आहे.
मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात बेळगावने विजयपूर (उत्तर कन्नडा) संघाचा 7 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र बागलकोट संघाने पहिल्या डावातच बेळगावचे 11 तर बेळगावने 7 गडी टिपले. 4 गडय़ांची आघाडी मिळवत बागलकोटने दुसऱया डावात बेळगावचे 9 गडी टिपले. पण बेळगावने दुसऱया डावातही 7 गडी टिपल्याने हा सामना बागलकोटने 6 गुणांनी जिंकला. या सामन्यात रोहित कुटे, नितीष पाटील, स्वप्नील पाटील व श्रेयस कोलेकर यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. रोहित पाटीलला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते मुलींच्या विजेत्या संघाला 30 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला 20 हजार रूपये रोख व चषक देण्यात आले. मुलांच्या गटात विजेत्या बागलकोट संघाला 30 हजार रूपये व चषक तर उपविजेत्या बेळगाव संघाला 20 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या संघाला एन. आर. पाटील, अशोक पाटील, एल. सी. लमाणी, अशोक बुदी व महेश सिद्दानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.









