सेमिकंडक्टर पुरवठय़ाअभावी वाढ कमीच : 59 हजार वाहनांची विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणा ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यावसायिक वाहनांकरिता चांगल्या ठरल्या आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीला नोव्हेंबरमध्ये म्हणावा तसा सनकारात्मक प्रतिसाद लाभला नव्हता. पण दुसरीकडे गेल्या नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीने मात्र सकारात्मकता दाखवली आहे. व्यावसायिक वाहन विक्रीमध्ये नोव्हेंबरमध्ये 11 टक्के वाढ इतकी दिसली आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये 59,872 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये विक्रीतील वाढ 11 टक्के अधिक राहिली आहे. जर का सीएनजी किट आणि सेमिकंडक्टरचा तुटवडा नसता तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये याहूनही अधिक वाढ निश्चितच दिसली असती, असे मत आयशर मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद अगरवाल यांनी मांडले आहे. याचाच अर्थ मालवाहतूकीच्या क्षेत्राने गती घेतली आहे, असा घेता येईल.
या वाहनांना मागणी वाढली व्यावसायिक वाहनांच्या मागणीचा विचार करता सीएनजीवर आधारित 5 ते 16 टन क्षमता वाहणाऱया वाहनांना मागणी दिसली आहे. एकंदर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीने नोव्हेंबरमध्ये चांगली घोडदौड सुरू ठेवली आहे.









