सुमेधा चिथडे यांचे उद्गार : गुरुवर्य मो. ग. कुंटे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम : सैनिकांचे स्मरण आपले कर्तव्य
प्रतिनिधी /बेळगाव
दुसऱयाच्या सुखातच स्वतःचं सुख मानणाऱया देशातील जवानांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा सैनिकांचे रोज स्मरण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. सीमेवर लढणाऱया जवानांच्या साहसी कर्तव्यामुळे राष्ट्र सुखाने जगते. युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या उपकाराची जाणीव कृतज्ञतेने ठेवूया, आणि घरी एक पणती आपल्या सैनिकांसाठी लावूया, असे उद्गार पुणे येथील सुमेधा चिथडे यांनी काढले.
गुरुवर्य मो. ग. कुंटे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर लोकमान्यचे संस्थापक-चेअरमन किरण ठाकुर, सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे, प्रा. अनिल पाटणेकर, गोविंद फडके उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गुरुवर्य मो. ग. कुंटेंच्या प्रतिमेचे पूजन झाले. मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. अनिल चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, प्रत्येक देशवासियांच्या मनात जन्मभूमीचा आदर असला पाहिजे. आपल्या सुरक्षिततेसाठी जवान रोज मृत्यूशी झुंज देत असतात. जवानांचे पराक्रम, कर्तव्य, संघर्ष, साहस आणि शौर्य समजून घेतले पाहिजे. त्यांच्या पराक्रमामुळेच आपल्या घरी दिवाळी साजरी होते. बोलले जाते ते सत्यात उतरविण्याचे काम जवानच करतात, असे सांगत त्यांनी चित्रफितीद्वारे सैन्याचे शौर्य दाखवून दिले.
कठोर प्रशिक्षण संघर्षातून सैन्याची वाटचाल सुरू असते. अशा जवानांच्या राष्ट्रसेवेमुळे राष्ट्र भक्कम उभे राहते. याकरिता लहान वयातच मुलांना शारीरिक, मानसिकदृष्टय़ा सक्षम केले पाहिजे. महान राष्ट्र घडविण्यासाठी राष्ट्राला काही तरी द्या, असे त्यांनी सांगितले.
सियाचीनमधील जवानांचा संघर्ष थक्क करणारा आहे. कारण या भागात युद्ध करणे तर सोडाच, एक श्वास घेणेदेखील पराक्रमापेक्षा कमी नाही. या ठिकाणी हेलिकॉफ्टर लँड होणे अवघड आहे. अशा कठीण परिस्थितीत जवान थंडी-वारा यांचा सामना करत केवळ बर्फात सेवा बजावतात. हा फार मोठा पराक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
किरण ठाकुर म्हणाले, लहानपणापासून जवळचा संबंध असणारे गुरुवर्य कुंटे गुरुजी एक तपस्वी व्यक्तिमत्त्व होते. कुंटे सरांनी आयुष्यभर चांगले शिक्षण देण्याचे कार्य केले. शिक्षणाबरोबर नाटय़कला ही कुंटे कुटुंबीयांच्या रक्तातच भिनली आहे. बलवान देश घडविण्यासाठी चांगल्या शिक्षकांची देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भालचंद्र कुंटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी रसिक श्रोते उपस्थित होते.