ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारताच्या ईशान्येकडील नागालँड राज्याच्या मोन जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात किमान १३ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्याचंही समोर आलंय. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली. स्थानिक ग्रामस्थ पिक-अपमधून घरी परतत असताना ओळख पटवता न आल्याने सुरक्षा यंत्रणांनी संशयित म्हणून त्यांच्यावर गोळीबार केल्याचे समजते आहे.
दरम्यान, गोळीबारानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात घडली. गाडीमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांच्या जवानांनी कथितरित्या त्यांच्यावर गोळीहार केला आणि त्यात १३ जणांचा मृत्यू झाला.
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेतील आकडा वाढून तो आता १३ वर पोहोचला, तर काहीजण जखमी आहेत. या प्रकरणात स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर संतत्प होत सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेनंतर मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आणि या घटनेची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. नागालँडच्या ओटिंगमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची कसून चौकशी करेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.









