सातारा आगार संघटनेच्या पदाधिकाऱयांनी पैसे खाल्याची जोरदार चर्चा
प्रतिनिधी/ सातारा
एसटीतील कर्मचाऱयांच्या हितासाठी संघटनांचे झेंडे बाहेर ठेवून संप गेली महिनाभर सुरु आहे. आता मात्र या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांच्यावर कारवाईचा बडगा सुरु केला आहे. मेस्मा अंतर्गत कारवाईची भीती जरी शासनाकडून दाखवण्यात आली असली तरीही एसटी महामंडळाचे कर्मचारी हे राज्य सरकारच्या सेवेत नसल्याने आमच्यावर मेस्माअंतर्गत कारवाई करता येणार नाही, असे एसटी कर्मचाऱयांनी सांगितले आहे. दरम्यान, काही कर्मचारी कामावर रुजू होवू लागले असून त्यांच्याकडून ग्रामीण भागात बसेस धावू लागल्या आहेत.
एसटीच्या कर्मचाऱयांनी राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेली महिनाभर सातारा विभागातून संप सुरु करण्यात आला आहे. संपाला सुरुवातीला फलटण आगारातून ठिणगी पडल्याने विभागीय पातळीवरुन फलटण येथील कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर सर्वच आगारातून कर्मचाऱयांना निंलबित व सेवा समाप्तीची कारवाई अधिकाऱयांनी सुरु केली. तरीही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. शनिवारीपर्यंत जिह्यात 11 आगारातून 229 जणांना निलंबित करण्यात आले तर 183 जणांची सेवा समाप्ती केली होती. त्यातील 50 जणांना पुन्हा कामावर घेतले असून अद्यापी 131 जणांची सेवा समाप्ती आहे. आठशे जणांनी काम सुरु केले आहे. त्यामुळे 11 आगारातील सातारा, पाटण, महाबळेश्वर, वडूज आणि कराड या पाच आगारातून ग्रामीण भागातील सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा आगारातून तारळे, लिंब, रहिमतपूर या तीन बसेस धावल्या.
वाई आगारातून दोन बसेस पोलीस बंदोबस्तात रवाना
वाई आगारात कडकडीत संप शनिवारपर्यंत सुरु होता. वाई आगारातील 13 कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली असून 4 कर्मचारी सेवेत रुजू झाले असून त्यांच्याकडून शनिवारी दोन बसेस प्रवाशांच्या सेवेकरता पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आल्या. त्यामध्ये पाचवडपर्यंत आणि सुरुरपर्यंत अशा दोन्ही बसेस गेल्या होत्या. आगारातील सर्वच एसटी कर्मचाऱयांनी दुपारी एकत्र येवून संप सुरु असल्याचे जाहीर केले. अफवावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन कर्मचाऱयांनी केले आहे.
महाबळेश्वर आगारातून ग्रामीण भागातही सेवा सुरु
महाबळेश्वर आगारातून सेवा सुरु झाली असून आज सकाळपासून ग्रामीण भागात एसटी धावल्याचे सांगण्यात आले. एसटी आगारात परंतु प्रवाशी वडापमध्ये अशी परिस्थिती होती.
संघटनेच्या अधिकाऱयांनी पैसे घेतल्याची जोरदार चर्चा
संपामध्ये संघटना म्हणून नाही तर कर्मचारी म्हणून सहभागी झालेले आहेत. मात्र, काही संघटनांच्या प्रतिनिधींनी काही मंत्र्यांच्याकडून पाकिटे घेऊन कर्मचाऱयांना कामावर येण्यास फितवले गेले आहे. त्यानुसार काही कर्मचारी कामावर येत आहेत. ह्या पुढाऱयाने तेवढे पैसे घेतले त्या पुढाऱयाने तेवढे पैसे घेतले त्यामुळे काही ठिकाणी कर्मचारी रुजू होत आहेत, अशीही एसटी कर्मचाऱयांमध्ये जोरदार चर्चा रंगत आहे.
शिवसेनेची संघटना कुठे गेली?
शिवसेना सत्तेत आहे. मंत्रीपद शिवसेनेचे आहे. एसटी कर्मचाऱयांची कामगार सेना साताऱयात आहे. एसटी कर्मचाऱयांचा संप सुरु असताना शिवसेनेची एसटी कामगार सेना कुठे आहे?, जिल्हा प्रमुख आहेत कुठे?, त्यांच्या संघटनेचे नेमके काय सुरु आहे यावर उलटसुलट चर्चा सध्या जिह्यात सुरु आहे.








