वृत्त संस्था/ ब्लोमफौंटेन
भारत अ-दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील दुसरी अनधिकृत कसोटी अनिर्णीत राहिली. उभय संघामध्ये तीन सामन्यांची ही मालिका खेळविली जात असून सोमवारपासून तिसऱया आणि शेवटच्या सामन्याला येथे प्रारंभ होणार आहे.
भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर आहे. या दौऱयामध्ये तीन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळविली जात आहे. प्रत्येक सामना चार दिवसांचा आहे. शुक्रवारी या मालिकेतील दुसरा सामना खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला.
या दुसऱया कसोटीत भारत अ संघाला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका अ संघाने दिले होते. शुक्रवारी यजमान दक्षिण आफ्रिका अ संघाने केवळ 96 धावांची भर घातली. जान्सनने 28 तर स्टूरमनने 26 धावा जमविल्या. त्यामुळे त्यांचा दुसरा डाव 212 धावांत संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिका अ संघाने एकूण 233 धावांची आघाडी घेत भारत अ संघाला विजयासाठी 234 धावांची आव्हान दिले. भारत अ संघातील इशान पोरलने या सामन्यात 82 धावात 6 बळी मिळविले. भारत अ संघाच्या दुसऱया डावात पृथ्वी शॉ 18 धावांवर तर प्रियांक पांचाळ शून्यावर बाद झाले. त्यानंतर अभिमन्यू ईश्व़रनने 117 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 55 तर हनुमा विहारीने 116 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 72 धावा जमवित ही कसोटी अनिर्णीत राखली. या जोडीने अभेद्य 133 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिका अ संघातील स्टूरमनने या सामन्यात 99 धावांत 7 गडी बाद केले. भारताच्या हनुमा विहारीला सामनावीर घोषित करण्यात आले.









