राष्ट्रवादी नगरसेवकांचा आरोप : कुठलीही भरीव कामे केली नाहीत : राज्यातील सत्ता काळात निधी आणला नाही : निधी आणला असल्यास गांधी चौकात व्यासपीठावर येवून सांगावे
प्रतिनिधी/इस्लामपूर
भुयारी गटार योजनेवरून काल नगरपालिकेत झालेला आत्मदहनाचा प्रयत्न व गोंधळाचा प्रकार हा इस्लामपूर शहराची अब्रू वेशीवर टांगण्यासारखा आहे. गेल्या १८० वर्षात असा निंदनीय व निषेधार्ह प्रकार कधीही घडला नसल्याचे सांगत शहराच्या प्रगतीसाठी विकास आघाडीने कोणती चांगली कामे केली आहेत. व शासनाकडून एक रुपया जरी आणला असेल तर ते गांधी चौकात येवून व्यासपीठावर सांगावे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्रकार बैठकीत केले.
यावेळी उपनगराध्यक्ष पाटील म्हणाले. कुठले तरी काम जनतेला दाखवण्यासाठी विषयपत्रिकेत नसलेले विषय घेऊन वारंवार दंगा करण्याचा प्रयत्न विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. एसटीपीच्या जागा ताब्यात घेऊन भुयारी गटार योजनेचे काम करण्यासाठी आम्ही सांगत होतो. विकास आघाडीचा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आता नागरिकांच्या लक्षात आला आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे म्हणाले, पेटवून घेतो, वरून उडी मारतो असे प्रकार निंदनीय आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी विकासाचे कोणतेही ठळक काम केले नाही. ते न केल्यामुळे भुयारी गटार योजनेच्या नावावर आपले आपले अपयश झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि विकास आघाडी यांच्यात आपापसात ताळमेळ नाही. त्यामुळे त्यांनी फक्त दंगा करून आपला कार्यकाल संपवला आहे.
शहाजी पाटील म्हणाले, आज इस्लामपूर बंद करुन विकास आघाडी व शिवसेनेने शेतकरी, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. भुयारी गटार योजनेसाठी यांनी पाठपुरावा केला का हे जनतेसमोर येऊन सांगावे. अँड. चिमण डांगे म्हणाले, राष्ट्रवादीने सत्ता असताना स्वच्छता अभियानात बक्षिसे मिळवली. मात्र यावेळेला इस्लामपूर नगरपालिकेचे या यादीत नाव ही नाही. इस्लामपूर शहरासाठी ही शोकांतिका आहे.
विकास आघाडीने पाच वर्षातील आपले अपयश लपवण्यासाठी प्रशासनावर खापर फोडले आहे. कालच्या सभेत घडलेल्या प्रकारामुळे शहराची राज्यभर बदनामी झाली आहे. खंडेराव जाधव म्हणाले, आज पर्यंत कुठल्याही मुख्याधिकाऱ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. विकास आघाडीच्या सत्तेत झालेले सर्व ठराव बेकायदेशीर आहेत. विषयपत्रिकेतील विषयावर चर्चा करणारी एकही मीटिंग झाली नाही. सभागृहात भाषणबाजी करून, वेळ वाया घालवून जनतेची दिशाभूल केली. शहराला वेठीस धरले, असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी विश्वनाथ डांगे, आनंदराव मलगुंडे, नगरसेविका सुनिता सपकाळ, जयश्री पाटील, जयश्री माळी, जरिना पुणेकर, संगीता कांबळे, वैशाली सदावर्ते उपस्थित होते.