कोल्हापूर / प्रतिनिधी
धुळे-नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजवर्धनसिंह कदमबांडे यांची पुन्हा निवड झाली आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत कदमबांडे यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा 12 विरूद्ध 5 मतांची पराभव करून अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होण्याचा बहुमान संपादन केला. उपाध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड झाली.
कदमबांडे यांची धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेवर कायमपणे सत्ता राहत आली आहे. त्याच बरोबर या जिल्ह्यात इतर सहकारी संस्था, कारखाने यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचयतीवरही कदमबांडे यांचेच वर्चस्व आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे त्यांनी विजय संपादन केला. महाराजसाहेबांची पुन्हा सत्ता आल्याने कदमबांडे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.
राजवर्धनसिंह कदमबांडे हे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे पणतु, शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे नातू आणि राजकन्या पद्माराजे (बेबीराजे) यांचे सुपुत्र आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आणि धुळ्याच्या कदमबांडे घराण्याचा वारसा लाभलेल्या राजवर्धनसिंह कदमबांडे यांचे समाजकारणात, विकासकामात मोठे योगदान आहे.