ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर जगातील अत्युच्च कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर कार्यरत असलेल्या भारतीयांचा बोलबाला होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाईट असलेल्या ट्विटरचा वापर जगभरात केला जात आहे, त्यातही भारतीय आघाडीवर आहेत. ’टायपिंग व्हॉट आय एम थिंकिंग दॅट एव्हरिवन्स रिडिंग’ असे ’ट्विटरचे’ पूर्ण नाव आहे. अगदी मोजक्मया शब्दांत नेमका संदेश पोहचवण्याचे काम करणाऱया या माध्यमाची लोकप्रियता थोडय़ा काळातच शिखरावर पोहचली. 2006 साली जॅक डोर्सी, बिझ स्टोन, नोहा ग्लास, इव्हॉन विल्यम्स यांनी त्याची सुरूवात केली. आपला संदेश जगभर पोहचवण्याची त्याची खासियत लोकांना आवडली. पराग अग्रवाल यांनी 2017 मध्ये तिथे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून सूत्रे घेतली. आपल्या अजोड कार्यक्षमतेच्या बळावर त्यांनी सीईओ पदापर्यंत मजल मारली. ’आर्टिफिशल इंटलिजन्स’ ही संकल्पना आता माणसाच्या जगण्याचा भाग बनली आहे. श्री. अग्रवाल यांनी त्यात आपले नैपुण्य सिद्ध केले आहे. ’ट्विटर’ किंवा तत्सम सर्वच माध्यमांमध्ये ’आर्टिफिशल इंटलिजन्स’ला महत्त्व आहे. आपापल्या भाषेत ’ट्विट’ करता येऊ लागल्याने इंग्रजीशिवाय अन्य भाषिक देशांमध्येही ते लोकप्रिय झाले आहे. भारतातील विविध भाषिक राज्यात ते आहेच पण मराठीत तर त्याची लोकप्रियता गगनाला भिडत आहे. इतकी की सृजनशील साहित्यनिर्मितीसाठी त्याचा वापर केला जात आहे. मध्यंतरी ’140 शब्दांची मराठी कथा’ स्पर्धा ’ट्विटर’वर आयोजण्यात आली होती. जगभरात सहा शब्दांच्या कथांचा ’टेन्ड’ एकेकाळी होता, त्या पार्श्वभूमीवर मराठीभाषिकांनी मारलेली ही ’क्रिएटिव्ह’ मजल मोठीच म्हणावी लागेल असो. पराग यांच्या निवडीमुळे भारतीय बाजारपेठेचा जास्तीत जास्त फायदा ’ट्विटर’ला व्हावा, अशी अपेक्षा असणारच. ’गूगल-अल्फाबेट’चे सुंदर पिचाई, ’मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला, ’ऍडोब’चे शंतनू नारायण, ’आयबीएम’चे अरविंद कृष्णा या मंडळींच्या पंगतीत पराग अग्रवाल जाऊन बसले आहेत. या चार-पाच मोठय़ा कंपन्या आज जगावर राज्य करीत आहेत. ’गूगल’ हा खऱया अर्थाने जगाचा ’विश्वकोश’ झाला आहे. त्याला ठाऊक नाही अशी कोणतीही गोष्ट नाही आणि त्याच्याशिवाय कोणाचेही पान हलत नाही. ’मायक्रोसॉफ्ट’,
’ऍडोब’ किंवा ’आयबीएम’बद्दलही थोडय़ा फार फरकाने असेच म्हणता येते. सार्वजनिक संदेश वहनाच्या क्षेत्रात ’ट्विटर’ने क्रांती केली आहे. प्रभावशील व्यक्तीच्या एखाद्या ’ट्विट’ने कोटय़वधींच्या व्यवहारावर परिणाम होतो. पराग अग्रवाल येत्या काळात ’ट्विटर’मध्ये कोणते अनुकूल बदल करतात आणि लोकप्रियता वाढवतात हे पाहणे औत्सुक्मयाचे ठरणार आहे. कोणत्याही कंपनीच्या यशात ग्राहकाची मागणी कोणती आहे याचे नेमके भान आणि त्या दृष्टीने केलेले व्यवस्थापन महत्त्वाचे असतेच. पण उच्च तंत्रज्ञानदेखील कळीचा मुद्दा आहे. भारतासारख्या अवाढव्य देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. जगाला दिशा देण्याचे काम येत्या काळात भारतीय तरूणच करतील, असे म्हटले तर तो भाबडेपणा ठरणार नाही. कारण, केवळ मोठय़ा कंपन्याच नव्हे तर अमेरिका, युरोप खंडातील महत्त्वाच्या देशातील राजकीय व्यवस्थांमध्ये भारतीय महत्त्वाच्या पदावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या डिजिटल स्ट्रटॅजिक टिममध्ये भारतात जन्मलेल्या आयेशा शहा महत्त्वाच्या पदावर होत्या तर कमला हॅरिस यांचेही नाव अग्र पातळीवर होते. इंद्रा नुयी यांना एकेकाळी ’व्हॉइस ऑफ अमेरिका’ म्हटले जात होते. ’मास्टरकार्ड’चे अजय पालसिंगबंगा, ’मायक्रॉन’चे संजय मेहरोत्रा, ’नेटऍप’चे जॉर्ज कुरियन, पालो अल्टो नेटवर्कचे निकेश अरोरा अशी सहज गवसणारी अन्य नावेही भारतीयांची छाती फुगवणारी आहेत. या सगळय़ा कंपन्यांनी आपल्या व्यवसाय विकासासाठी भारतच नजरेसमोर ठेवला आहे. आगामी काही वर्षात भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक होणार आहे. तसाच तो सर्वात जास्त तरुणांचा देश ठरणार आहे. त्याही दृष्टिकोनातून या निवडीकडे पाहणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये आभासी जगाचे कर्तेधर्ते वास्तव जगावर राज्य करतील, असे भाकीत वर्तवले जात आहे. त्यासाठी रणभूमीवर युद्ध करण्याची गरज राहणार नाही. आर्थिक व्यवहार असो किंवा मनोरंजन, कला-संवाद असो किंवा प्रसार माध्यमे; सगळय़ाचे चालक-मालक जगाला दिशा देतील, तिथल्या संस्कार-संस्कृतीला चालना आणि आव्हान देतील. त्या कंपन्या हाताळण्याची ज्याची ताकद मोठी, तो खरा ’विश्वकर्मा’ ठरणार. ज्या पद्धतीने या कंपन्या जगभरात हातपाय पसरत आहेत, आपला प्रभाव निर्माण करीत आहेत, ते पाहता सगळय़ाच देशांचे स्वातंत्र्य नावापुरते राहिल. त्यांची सूत्रे मात्र, या कंपन्या हलवतील. भारतामध्ये शहरीकरणाचा वेग वाढला आहे. ग्रामीण तरुणांमध्ये तंत्रज्ञान वापराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सगळे व्यवहार होत आहेत. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण, विविध व्यवहार होतात. त्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शहरात प्रवासाच्या तिकिटापासून इच्छाभोजनापर्यंत सर्व गोष्टी मोबाईलच्या सहाय्याने विविध ’ऍप’चा वापर करून केल्या जात आहेत. तंत्रज्ञान मानवी व्यवहारावर प्रभुत्व गाजवू लागले की जगण्याचे स्वातंत्र्य धोक्मयात येते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये वाढीला लागलेली ’ऑनलाईन गेम’ खेळण्याची मानसिकता त्याचेच द्योतक आहे. अशी आणखी अनेक उदाहरणे देता येतील. मानवी वृत्तीप्रवृत्तींचा विचार करता त्यातून गुणात्मक बदल जसे होतील, तसा प्रतिकूल परिणामही होईल. ’क्रिप्टोकरन्सी’ची लोकप्रियता पाहता आर्थिक गुन्हेगारीला मोठा वाव मिळणार यात शंका नाही. जगभरातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये भारतीयांचा बोलबाला वाढत आहे, असे म्हणताना त्याची दुसरी बाजूही सजगपणे तपासण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.
Previous Articleअझरबैजानमध्ये सैन्य हेलिकॉप्टर कोसळले
Next Article गंभीर रुग्णांना ‘बूस्टर डोस’ शक्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








