भारतीय यंत्रणांवर केला आरोप – अँटिग्वामध्ये आहे आरोपी
वृत्तसंस्था / अँटिग्वा
फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला भारतीय यंत्रणांकडून अपहरण होण्याची भीती सतावत आहे. अपहरण करत त्याला गुआना येथे नेण्यात येईल आणि तेथून बेकायदेशीर पद्धतीने भारतात हलविले जाणार असल्याची भीती त्याला वाटू लागली आहे.
माझे अपहरण करत गुआना येथे नेले जाऊ शकते. तेथे भारतीयांचे प्रमाण मोठे आहे. याचा लाभ घेत मला बेकायदेशीर पद्धतीने भारतात नेले जाऊ शकते असे मेहुलने वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे.
अँटिग्वामधील स्वतःच्या घरातच मी कैद आहे. स्वतःच्या प्रकृती अस्वास्थामुळे कुठेच ये-जा करू शकत नाही. तसेच माझे अपहरण करणाऱया भारतीय यंत्रणांनी मला दिलेल्या वेदनादायी अनुभवामुळे माझ्या प्रकृतीला धक्का बसला आहे. मी माझ्या मानसिक आरोग्यासाठी मदत मागतोय, कारण मी घाबरलो आहे. मागील काही महिन्यांच्या अनुभवामुळे आजही मी धक्क्यात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही मी घरातून एक पाऊलही बाहेर टाकू शकत नाही. खराब प्रकृतीमुळे बाहेर जाऊ शकत नाही आणि काही करू शकत देखील नसल्याचा दावा मेहुलने केला.
माझे वकील अँटिग्वा आणि डोमिनिका दोन्ही ठिकाणी खटला लढत आहेत. विजय मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. मी अँटिग्वाचा नागरिक असून मला माझ्या इच्छेच्या विरोधात अपहरण करत अन्य देशात नेण्यात आले. राष्ट्रकुल देशांच्या कायदा-सुव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचे मेहुलने म्हटले.
मेहुल चोक्सी 23 मे रोजी अँटिग्वामधून गायब झाला होता आणि त्याला डोमिनिकामध्ये पकडले गेले होते. डोमिनिका पोलिसांनी त्याला अवैध प्रवेशासाठी अटक केली होती. त्यानंतर 12 जुलै रोजी डोमिनिका न्यायालयाने त्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. तेव्हा मेहुलने भारतीय यंत्रणांनी आपले अपहरण केले होते असा आरोप केला होता.
62 वर्षीय मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेची 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मेहुल चोक्सीने 2018 मध्ये भारतातून पळ काढला होता.