महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचा सल्ला : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दक्षतेचे आवाहन : तिसरी लाट आली तर सामना करण्यास महापालिका यंत्रणा सज्ज
प्रतिनिधी/कोल्हापूर
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्यानंतर जगभराबरोबर भारतातही खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्यता आणि भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने जर तिसरी आली तर तिचा सामना करण्याची तयारी ठेवली आहे. कोरोनाच्या साथीत तयार केलेली यंत्रणा संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागासह प्रशासनातील अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. कोरोनाची साथ संपली, कोरोना गेला असे समजून काही नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. तो त्यांनी तातडीने घ्यावा, असे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले.
‘तरुण भारत’शी बोलताना डॉ. बलकवडे यांनी कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, अशी भावना व्यक्त केली. जर लाट आलीच तर महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात येईल, मात्र नागरिकांची जबाबदारी महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, कोल्हापूर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय फ्लाईट नाहीत. त्यामुळे परदेशातून थेट प्रवासी कोल्हापुरात येत नाहीत. पण पुणे, मुंबई कोल्हापूरला जवळ आहेत. त्यामुळे सर्व आम्ही खबरदारी म्हणून या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संवाद साधून आहोत.
कोरोनाची तिसरी लाट येईल की, नाही ते माहित नाही. पण ती येऊ नये अशीच इच्छा आहे. पण लाट आलीच तर तिचा सामना करावा लागेल. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. सध्या कोरोना गेला म्हणून अनेक नागरिक कोरोनाच्या दुसऱया लसीच्या डोसचा कालावधी संपला तरी तो घेताना दिसत नाहीत. काहींनी तर पहिला डोसही घेतलेला नाही. कोरोनाविरोधात लढताना लस घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तरी रूग्ण गंभीर होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन दुसरा डोस घ्यावा, ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही, त्यांनीही ते घ्यावेत, असे डॉ. बलकवडे यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात महापालिकेने कोविड सेंटर्ससह यंत्रणा उभारली होती. गरजेप्रमाणे ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. आŸक्सीजन बेडबाबतही आदेश दिले आहेत, असे डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचे नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही
कोरोना संपला असा समज करून सध्या कोरोनाचे नियम पाळले जात नाही. यापुढे व्हेरीएंट बदलण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत आणि इतराच्या आरोग्याच्या काळजीसाठी सातत्याने मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे प्रमुख नियम आणि उपाय पाळावेत, असे कळकळीचे आवाहन प्रशासक डॉ. बलकवडे यांनी केले.