केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : भंडारी समाज वधू-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /पणजी
कोणताही समाज एकसुत्रात बांधून ठेवण्यासाठी स्नेहमेळावे महत्वाचे असून हे स्नेहबंध अधिक दृढ करण्यासाठी असे मेळावे वारंवार होणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
गोमंतक भंडारी समाजातर्फे आयोजित अखिल गोवा वधू-वर मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ताळगाव येथे सामाजिक सभागृहात रविवारी आयोजित या सोहळ्यास व्यासपीठावर माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महिला अध्यक्ष शुभांगी वायंगणकर, देवानंद नाईक, जोगुसो नाईक, फक्रू पणजीकर, आदींची उपस्थिती होती.
लहानपण, शिक्षण, विवाह आणि पुढे सुखाने संसार करण्याकडे जे मार्गक्रमण माणूस करत असतो त्यातील योग्य जोडीदाराची निवड हा पडाव फारच महत्वाचा असतो. या पडावात प्रत्येकजण चिंतेत असतात. वयात आलेल्या मुलास वा मुलीस योग्य जोडीदार मिळावा व त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी प्रत्येक पालकांची चिंता असते. एकदा ती पार पडली की आपण चिंतामुक्त होऊ अशी त्यांची अपेक्षा असते.
या पडावात अनेकदा अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी समाजसंस्थांनी पुढाकार घेऊन असे वधू-वर मेळावे आयोजित केल्यास पालकांची चिंता बऱयाच प्रमाणात कमी होण्यास मदत होते, असे श्रीपाद नाईक म्हणाले. भंडारी समाजाने असे काम हाती घेऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याबद्दल समाज समिती अभिनंदनास पात्र आहे, असे नाईक पुढे म्हणाले.
समाज एकसंघ ठेवणे, समाजाच्या चिंता, अडचणी दूर करणे, समाजावर अन्याय होत असेल तर योग्य न्याय मिळवून देण्याचे जे कार्य भंडारी समाज समितीने हाती घेतले आहे ते खरोखरच प्रशंसनीय आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, समाजातील अत्यंत हलाखीच्या स्थितीत जीवन जगणाऱया कुटुंबांना त्यांच्या मुलांचे विवाह स्वखर्चाने करणे झेपत नाही, अशा कुटुंबातील मुलांचे विवाह लावून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन समाज संस्थेने दिले आहे. हे कार्य सुद्धा अभिनंदनीय आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या चिंता दूर होण्यास मदत होईल. ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांनी लाभ घेण्यासाठी अवश्य पुढे यावे, असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.
त्याचबरोबर आमच्या समाजात अनेक श्रीमंत लोकही आहेत, त्यांनी अशा कार्यास मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही श्री. नाईक म्हणाले.
व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी प्रास्ताविक भाषणात मेळाव्याचा हेतू विषद केला. या मेळाव्याच्या आयोजनासाठी प्रचंड मेहनत घेतलेल्या सौ. संध्या पालेकर यांचा श्रीपाद भाऊंच्या हस्ते श्रीरुद्रेश्वराची प्रतिमा भेट देऊन गौरव करण्यात आला. मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे 400 वधू-वरांनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती.









