काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराचा आटापिटा सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीदेखील काही दिवसांपूर्वी रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे काम थांबविण्यात आले. असे असले तरी येळ्ळूर रस्त्याजवळ पोलिसांची वाहने तैनात करण्यात आली आहेत. शनिवारी पुन्हा हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शेतकऱयांनी तीव्र विरोध करत पुन्हा काम बंद केले आहे. न्यायालयाची स्थगिती प्रत दाखविताच काम बंद करण्यात आले आहे.
न्यायालयाने सध्या कामाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर सुनावणी होईतोवर काम सुरू करायचे नाही, असे स्पष्ट केले आहे. असे असले तरी न्यायालयाची दिशाभूल करून या रस्त्याचे कामकाज सुरू करण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयामध्ये शेतकऱयांच्या बाजूने ऍड. रविकुमार गोकाककर यांनी आपली बाजू ठामपणे मांडली आहे. मात्र, न्यायालयामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकील न्यायालयाला खोटी माहिती देऊन रस्ता करण्यासाठी धडपडत असताना दिसत आहेत.
रस्त्याचे काम बंद राहिले तरी या परिसरात पोलीस संरक्षण ठेवले गेले आहे. पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचून आहे. त्यामुळे पूर्ण काम बंद आहे. न्यायालयीन स्थगिती असल्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला असला तरी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. अनेकवेळा न्यायालयाचा अवमान करतच रस्त्याचे कामकाज केले गेले आहे. तेव्हा शेतकऱयांनीही जागरुक राहून त्याचा विरोध करणे गरजेचे आहे. शनिवारी शेतकरी अनिल अनगोळकर, संजय सुळगेकर यांनी ठेकेदार लक्ष्मण चौगुले यांना न्यायालयाची प्रत दिली. त्यानंतर हे काम पुन्हा बंद करण्यात आले.
हलगा-मच्छे रस्त्याचे कामकाज काही दिवसांपूर्वी मच्छे गावाकडून सुरू करण्यात आले. शेतकऱयांच्या उभ्या पिकांमध्ये जेसीबी फिरविण्यात आला. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले. आता न्यायालयाने या कामाला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत न्यायालयामध्ये या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत काम करू नये, असे म्हटले आहे. तरीदेखील मध्यंतरी कंत्राटदाराने न्यायालयाचा अवमान करतच काम सुरू केले होते. त्यानंतर पुन्हा शेतकऱयांनी त्याला विरोध केला आहे.









