अवकाळीचा फटका, शिवारात चिखल-पाण्याचा अडथळा
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील पंधरादिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने भातपिकाला मोठा फटका बसला आहे. त्याबरोबर सुगी हंगामातील कामे देखील थांबली होती. मात्र आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा सुगी हंगामाकडे वळला आहे. मात्र शिवारात पाणी आणि चिखल असल्याने कापणीत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच भात कापणीला उशिर झाल्याने धान्य झडून नुकसान होत आहे.
नोव्हेंबर प्रारंभापासून शेतकऱयांनी बटाटा, भुईमूग, रताळी काढणीबरोबर भात कापणीला सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर अवकाळी पावसाने जोर वाढविल्याने सुगी हंगामात व्यत्यय निर्माण झाला होता. अवकाळी पावसाने तालुक्मयातील 1 हजार 382 हेक्टरमधील भातपिकाला फटका बसला आहे. काही भागात कापणी झाल्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने भातपिक कुजले आहे. तर काही ठिकाणी उभ्या भातपिकावर पाऊस झाल्याने फटका बसला आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी शिवारात पाणी आणि चिखल असल्याने कापणीत अडथळा निर्माण होत आहे. भात कापणीला उशिर झाल्याने भात झडून नुकसान होण्याची चिंता बळीराजाला लागली आहे. त्यामुळे भात कापणीसाठी धडपड पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे शिवारात पाणीच पाणी झाल्याने भात कापणी लांबणीवर पडली आहे. काही पाणथळ शिवारात अद्याप मोठय़ा प्रमाणात असल्याने भात कापणी शक्मय नाही. त्यामुळे पुढील रब्बी हंगामातील पेरणीदेखील लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
रब्बी हंगाम लांबणीवर
अवकाळी पावसामुळे भात कापणीत अडथळा निर्माण होत आहे. काही शिवारात पाणी असल्याने भात कापणी पुढे गेली आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर देखील याचा परिणाम होणार आहे. रब्बी हंगामातील मसूर, वाटाणे, हरभरा या कडधान्यांची पेरणीदेखील लांबणीवर पडणार आहे.









