प्रतिनिधी / सातारा :
रिपाइंमध्ये सर्व जातीधर्मातील लोक आहेत. पक्ष राज्यात मजबूत आहेच. परंतु सातारा जिल्ह्यात येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका या स्वबळावर लढवण्यात येणार आहेत. सातारा पालिकेची निवडणूक रिपाइं लढवणार असून 14 जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, अशी घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय नेते दीपक निकाळजे यांनी केली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीपक निकाळजे म्हणाले, येणाऱ्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणूका लढवण्यात येणार आहेत. त्याकरता राज्यामध्ये रिपाइंची घौडदौड सुरु आहे. सातारा पालिकेमध्ये रिपाइं 14 ठिकाणी आपले उमेदवार उभे करुन ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्यात दादासाहेब ओव्हाळ यांनी पक्ष मजबूत केला आहे. सर्व समाजातील घटकांचा सहभाग केलेला आहे. निवडणूकीमध्ये सातारकरांना ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेष करुन शहरातील दलितवस्तीच्या सुधारणेकरता प्राधान्य राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, कैलास जोगदंड, सोमनाथ धोत्रे, मदन खंकाळ आदी उपस्थित होते.