मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहात. पण हे आरोप समीर वानखेडेंवर नसून केंद्रीय यंत्रणांवर केले आहेत. मलिक यांनी केंद्रीय यंत्रणा मला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. त्यांनी अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ केला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच याबाबत माझ्याकडे पुरावे देखील असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नवाब मलिक म्हणाले, “दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत आहोत. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिलीय. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं असता ते भाजपाशी संबंधित असल्याचं दिसत आहे. तसेच अनिल देशमुख यांचहाबरोबर जसा खेळ झाला तसंच सुरू झालं आहे. याबाबत माझ्याकडे महिती आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात येईल,” असंही ते म्हणाले.
“जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, त्यांना घाबरवलं जात असेल तर हे सहन केलं जाणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. यासंबंधी मी अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे,” असंही मलिकांनी नमूद केलं.