प्रतिनिधी /बेळगाव
विधानपरिषद निवडणुकीतून शेवटच्या दिवशी आणखी दोघांनी माघार घेतली असल्याने सहा जणच रिंगणात आहेत. शुक्रवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यादिवशी संगमेश चिकनारगुंद आणि अशोक हंजी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण सहा जण रिंगणात आहेत.
जिल्हय़ातील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजप, काँग्रेस यासह आप व अपक्षांनी अर्ज दाखल केले होते. एकूण 10 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामधील एक अर्ज अवैध झाल्याने 9 अर्ज शिल्लक होते. त्यानंतर गुरुवारी जगदीश कवटगीमठ यांनी माघार तर शुक्रवारी आणखी दोघांनी माघार घेतल्याने आता 6 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
विधानपरिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून घेतली जाते. महापालिका, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या मतदानातून निवडणूक घेतली जाते. बऱयाच नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा तसेच तालुका पंचायत यांच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीपासून वंचित झाले आहेत. मात्र आता सध्या सत्तेत असलेल्या सर्व सदस्यांना चांगले दिवस आले आहेत. एकूणच ही निवडणूक चुरशीची होणार असल्याने साऱयांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे.









