नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुक्मयातील बंकी गावातील एका कुटुंबीयाला एम. के. हुबळी येथे लग्न समारंभात जेवण करून घरी आल्यानंतर उलटी-जुलाबाचा त्रास झाल्याने लागलीच त्यांना नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर व्यक्तींना अन्नातून विषबाधा झाल्याचे तपासात दिसून आले आहे.
बंकीतील जमादार कुटुंबातील सहा मुलांसह एकूण 11 जण हुबळी येथे विवाह कार्यक्रमाला मंगळवारी गेले होते. लग्न सोहळय़ात जेवण करून घरी आल्यानंतर रात्री त्यांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील सहा मुलांसह 11 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत.
जमादार कुटुंबातील सर्व सदस्य मंगळवारी दुपारी एम. के. हुबळी येथे गेले होते. रात्री ते बंकी गावातील आपल्या घरी परतले. त्यानंतर या सर्वांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. लागलीच त्यांच्यावर उपचार झाल्याने त्यांची प्रकृती साद्या धोक्मयाबाहेर असल्याचे कळते.
अत्यवस्थ झालेल्यांमध्ये अब्दुल समद जमादार (वय 70), नमाजबी जमादार (वय 56), महंमद जमादार (वय 40), सरताज जमादार (वय 35), शहनाज जमादार (वय 32), साहिर जमादार (वय 15), सिमरन जमादार (वय 12), तुषार जमादार (वय 12), सहना जमादार (वय 8), अल्फिया जमादार (वय 10), अजान जमादार (वय 4) यांचा समावेश आहे.
आरोग्याधिकाऱयांनी दिली भेट
या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांदे यांनी तातडीने नंदगड येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन जमादार कुटुंबीयांची विचारपूस केली. डॉ. अर्चना माळगी, मुख्यवैद्याधिकारी डॉ. यल्लनगौडा पाटील, डॉ. राजश्री बडसगोळ, डॉ. भूषण हे लहान मुलांची तपासणी करून उपचार करत आहेत.









