वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या पलक्कड जिल्हय़ात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्याच्या हत्येप्रकरणी पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) एका पदाधिकाऱयाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मांबरम येथील ए. संजीत यांच्या हत्येत पीएफआयचा हा पदाधिकारी थेट सामील होता. अन्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख आर. विश्वनाथ यांनी दिली आहे.
पीएफआय पदाधिकाऱयाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. संघ स्वयंसेवकाची हत्या त्याच्या पत्नीसमोरच करण्यात आली होती. याचमुळे स्वयंसेवकाच्या पत्नीने आरोपींची ओळख पटविल्यावरच यासंबंधीच माहिती जाहीर करण्यात येईल.
15 नोव्हेंबर रोजी संजीत हे पत्नीला तिच्या ऑफिसमध्ये सोडण्यासाठी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दिवसाढवळय़ा झालेल्या या निर्घृण हत्येमागे इस्लामिक संघटना पॉप्युलर प्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)ची राजकीय शाखा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप भाजप आणि संघाशी संबंधित संघटनांकडून करण्यात आला होता.
याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत संजीत यांच्या हत्येची चौकशी एनआयएमार्फत करविण्याची मागणी केली आहे. केरळमध्ये कथित जिहादी गटांकडून मागील 5 वर्षांमध्ये संघ आणि भाजपच्या 10 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत संघ परिवाराच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांचा धर्मांधांकडून जीव घेण्यात आल्याचे सुरेंद्रन यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले गेले आहे.









