वाढत्या प्रवाशांमुळे ’रेलबस’ अत्यावश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा विमानतळापासून बेळगावला येण्यासाठी त्वरित रेलकारची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन सीटीझन्स कौंन्सीलने बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांना मंगळवारी सायंकाळी दिले. या निवेदनाची प्रत केंदिय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाध्ये यांना पाठवुन देण्याची विनंती करण्यात आली. आपण या मागणीचा गांभिर्याने करुन त्याची कार्यवाही होण्यासाठी निश्चित प्रयत्न करु अशी ग्वाही राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
निवेदनात कौन्सीलने म्हंटले आहे की, बेळगाव विमान तळ हे देशातील महत्त्वाच्या शहराना जोडले गेले असून विमानतळावर वाढत्या प्रवासी संख्येमुळे महत्व आले आहे. बहुसंख्य प्रवासी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु याच विमानतळावरून प्रवाशांना बेळगावला येण्यासाठी रेलकार किंवा अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. प्रवाशांच्या सोईसाठी विमानतळ ते बेळगाव शहर दरम्यान रेल बस सुरु करावी.
सांबरा विमानतळावरील दिल्ली, मुंबई, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद, पुणे येथे प्रवास करणाऱया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुसंख्य प्रवासी विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. विमानतळावर आलेल्या प्रवाशाला किंवा बेळगावहुन विमानतळावर जाणाऱया प्रवाशाला रिक्षा किंवा टॅक्सी शिवाय कोणताही पर्याय नाही. मात्र त्यांचे अनुक्रमे 1500 ते 1000 रूपये पर्यंतचे भाडे अवास्तव आहे. बेळगाव रेल्वे स्टेशन हे महत्वाचे स्टेशन असून, बेंगळूर आणि मुंबईला येथुन रेल्वे सुविधा आहेत. सांबऱयाला सुद्धा रेल्वेस्टेशन असून ते बेळगाव विमानतळाला अतिशय जवळचे आहे. सर्व संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर) उपलब्ध असून, त्याचा उपयोग विमान प्राधिकरणाने करून घ्यावा व त्वरित रेल बस किंवा रेल कार्डची सुविधा सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
भारतातील अन्य विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध आहे. रेल कारच्या सुविधामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. आणि प्रवास करणेही सुकर होणार आहे.परिणामी विमान प्रवास करणाऱयांची संख्याही वाढण्याची शक्मयता आहे. या सर्वांचा विचार करून विमान प्राधिकरणाने रेल्वे खात्याशी लवकरात लवकर चर्चा करून परस्पर समन्वयाने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल कारची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सदर निवेदन कौंन्सिलचे अध्यक्ष सतिश तेंडुलकर व अरूण कुलकर्णी यांनी दिले.