निफ्टीतही 348 अंकांची घसरण – बजाज फायनान्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण अनुभवायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक मोठय़ा घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्सचे समभाग सोमवारी सर्वाधिक नुकसानीत होते.
भारतीय शेअर बाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी मोठय़ा प्रमाणात घसरण नोंदवत होता. सरतेशेवटी 1170 अंकांच्या घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 58,465.89 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 348 अंकांच्या घसरणीसह 17,416.55 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
सकाळपासूनच घसरणीसह बाजाराने सुरूवात केली ती घसरण दुपारपर्यंत थांबत नव्हती. 12.15 वाजता सेन्सेक्स 1121 अंकांच्या घसरणीसह 58,514 अंकांवर कार्यरत होता. बीएसईवर बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक 5.49 टक्के इतके घसरणीत होते. तर रिलायन्सचे समभाग 4.17 टक्के इतके घसरले होते. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 319 अंकांच्या घसरणीसह 17,445 अंकांवर कार्यरत होता. बाजार भांडवलात 10 लाख कोटी रुपयांची घसरण दिसून आली. म्हणजेच दर मिनीटाला 7 हजार 500 कोटी रुपये इतकी घसरण नोंदली गेली. बीएसइचे बाजार भांडवल 258.92 लाख कोटी रुपयांवर राहिले होते. याआधी गुरूवारी बाजार भांडवल 269.20 लाख कोटी रुपये इतके होते.
आठवडय़ाच्या सोमवारची सुरूवातच शेअर बाजाराची निराशायादी ठरली. सुरूवातीनंतर काही वेळातच सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांच्या घसरणीसह कार्यरत होता. तर दुसरीकडे निफ्टी निर्देशांकही 133 अंकांच्या घसरणीसह कार्यरत होता. बहुचर्चीत पेटीएमचे समभाग बाजारात सोमवारी सकाळीही मोठय़ा घसरणीला तोंड देत होते. बजाज फायनान्ससह एलटी, टायटन, एचडीएफसी, डॉ. रेड्डिज लॅब्जचे समभाग घसरणीत होते. भारती एअरटेल मात्र नफ्यात होती.








