शेतामध्ये तुंबलेल्या पाण्यात अर्धनग्न अवस्थेत मांडले ठाण
प्रतिनिधी /बेळगाव
संपूर्ण आयुष्य ज्या जमिनीने घडविले, अनेक पिढय़ा या जमिनीवरच जगल्या. मात्र आज हीच जमीन हिसकावून घेतली जात आहे. यामुळे शेतकरीवर्ग अक्षरशः हतबल झाला आहे. दडपशाही आणि बेकायदेशीरपणाने जमिनी काढून घेतल्या गेल्या. यातच निसर्गानेही अवकाळी पावसाच्या रुपाने थोडासा असलेला घासही हिसकावून घेतला. यामुळे शेतकरी पूर्ण तणावाखाली आला. लढा लढला, न्यायालयात जिंकलो तरी देखील आम्ही प्रशासनाच्या बेकायदेशीरपणा समोर हरलो, असे म्हणत त्यांनी शुक्रवारी अवकाळी पावसाने तुंबलेल्या पाण्यात बसून जिल्हा प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
शुक्रवारी शेतकरी भर पावसात अंगावरील कपडे काढून पाण्यात ठाण मांडून बसले. आता जगून तरी काय उपयोग आहे? असे म्हणत त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
गेल्या काही दिवसांपासून लढा लढत असल्यामुळे अनेक शेतकरी तापाने फणफणत होते तर काही शेतकरी सर्दी, खोकला या आजाराने त्रस्त होते. तशा अवस्थेतसुद्धा लहान मुलासह पाण्यात बसून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. आता रस्ता करा, भविष्यात तुम्हाला हिसका दाखवू, असे या आंदोलनातून सुनावले आहे.
शेतकऱयांनी हलगा-मच्छे बायपासचा खटला न्यायालयात आहे. उच्च न्यायालयाने या रस्त्याबाबत झिरोपॉईंट ठरविण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडे खटला वर्ग केला आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झिरोपॉईंट बाबत माहिती दिली नाही. न्यायालयीन प्रक्रियेत आपले म्हणणे न मांडता रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आले आहे. पोलीस फौजफाटा घेऊन दडपशाही करुन रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र आम्ही शेवटपर्यंत या रस्त्याला विरोध करणार असून रस्त्यावरील लढाईबराब्sारच न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचे यावेळी शेतकऱयांनी सांगितले आहे.
देर है लेकिन अंधेर नही. कारण केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱयांच्या विरोधात जे तीन काळे कायदे अंमलात आणले. त्या विरोधात तब्बल एक वर्षे लढा शेतकरी लढले. शेवटी शुक्रवारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलात आणलेले जे जाचक कायदे आहेत, ते रद्द करु, असे सांगितले. संसदेत याबाबत चर्चा करुन ते तीन कायदे मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आम्हाला एक वर्षे झगडावे लागले. आता या रस्त्यासाठीही आम्ही लढत राहणारच असा निर्धार शेतकऱयांनी शुक्रवारी केला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम मच्छे गावाकडून सुरू करण्यात आले. उभ्या पिकामध्ये जेसीबी घालून ऊस पिक भुईसपाट करण्यात आले. त्यामुळे शेतकऱयांतून संताप व्यक्त करण्यात आला. ऊस असलेल्या जमिन मालकाच्या मुलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका मुलाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले तर दुसऱया मुलाने झाडावर चढुन जीव देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर चौपट नुकसान भरपाई देवू, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱयांनी त्या मुलाला आवाहन करुन झाडावरुन खाली उतरविले होते.
हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी उभ्या पिकात प्रशासनाने जेसीबी घुसविला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकात जेसीबी घालण्याचा घाट रचून पिके आडवी केली. ही आडवी होणारी पिके पाहून शेतकरी अक्षरशः तळमळला. या प्रकारामुळे संपूर्ण कर्नाटकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. बऱयाच शेतकऱयांनी नुकसान भरपाई घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र नुकसान भरपाई घेतलेल्या शेतकऱयांच्या जमिनीच या रस्त्यात गेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने नेमकी कुणाला नुकसान भरपाई दिली, हे सांगणे गरजेचे आहे.
रस्ता करायचा असेल तर चर्चा करा, जमिनीच्या बदल्यात जमीन द्या किंवा जमीनीला योग्य दाम द्या, अशी वारंवार मागणी शेतकऱयांनी केली. मात्र त्याची कोणतीच दखल न घेता थेट मच्छेपासून हलग्यापर्यंत होणाऱया रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. यापूर्वी शेतकऱयांनी तीव्र आंदोलन करुन विरोध दर्शविला होता. अनेकवेळा शेतकऱयांनी कंत्राटदाराला पिटाळून लावले. शेतकऱयांची ताकद एकत्र आली आणि हा रस्ता बरेच दिवस तटविला होता. मात्र पोलीसांचे सहकार्य घेत शेतकऱयांवर दडपशाही करत शेतकऱयांच्या जमिनी घेतल्या गेल्या.









