पंतप्रधान मोदी यांच्या बुंदेलखंड दौऱयात अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ
झांशी / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केले आहे. शुक्रवारी त्यांनी या राज्याच्या बुंदेलखंड भागाचा दौरा केला. इतिहासप्रसिद्ध झांशी या शहराच्या नजीक असणाऱया राणी लक्ष्मीबाईच्या किल्ल्यातून त्यांनी भारतीय वायुदलाला लढाऊ हेलिकॉप्टर्स प्रदान केली. उत्तर प्रदेशात संरक्षण सामग्री निर्मिती करण्यासाठी मार्गिका (कॉरिडॉर) विकसीत केली जात आहे. या मार्गिकेचे ‘सारथ्य’ बुंदेलखंड करेल, असे उद्गार त्यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात काढले.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची भारताची महत्वाकांक्षा आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शुक्रवारी झांशीत ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात त्यांनी ‘संरक्षण मार्गिके’ची कोनशीला स्थापन केली. हा कार्यक्रम झांशीच्या प्रसिद्ध राणी लक्ष्मीबाई किल्ल्यात झाला. या कार्यक्रमात त्यांनी भारतीय वायुदलाला स्वदेशनिर्मित हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स प्रदान केली. तसेच अत्याधुनिक सौर ऊर्जा उद्यानाचा शिलान्यास केला. राष्ट्रीय कॅडेट कोर (एससीसी) या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचा शुभारंभ केला. ते या संघटनेचे प्रथम सदस्यही झाले. झांशीतील कार्यक्रमाच्या आधी त्यांनी महोबा येथे ‘अर्जुन’ साहाय्यक परियोजनेचे लोकार्पण केले.
मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड
गेली अनेक दशके भारत जगातील सर्वात मोठय़ा शस्त्र खरेदीदार देशांमधील एक म्हणून ओळखला जात होता. देशासाठी आवश्यक शस्त्रास्त्रांची निर्मिती देशात होत नव्हती. आपल्याला विदेशी सामग्रीवर अवलंबून रहावे लागत होते. पण आता भारतातच उत्कृष्ट गुणवत्तेच्या शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जात आहे. आज ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे आमचे सूत्र आहे. आपल्या सेना दलांचे सामर्थ्य आज वाढत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांना देण्यात येत आहे. डिजिटल कियोस्कचा प्रारंभ करण्यात आला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रारंभापासून लक्ष द्यावयास हवे होते
जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्याकडे पुष्कळ संधी होती. सरदार पटेलांना जसा देश घडवायचा होता, तसा घडविण्याची संधी तेव्हापासून होती. आता स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपल्याला पुन्हा तोच संकल्प करायचा आहे, असे सूचक विधानही पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात केले.
तर इतिहास वेगळा असता…
1857 मध्ये इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढा लढला गेला. त्यावेळी इंग्रजांइतकी साधने आणि स्रोत झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे असते, तर इतिहास काही वेगळाच घडला असता. भारत कोणाविरोधातही कोणतेही युद्ध पराक्रमाच्या कमतरतेमुळे हरलेला नाही. आमच्या सरकारने महिलांमधील क्षात्रतेज जागृत करण्यासाठी प्रशिक्षण शाळा स्थापन केल्या आहेत. अशा 33 शाळांमधून भविष्यकाळात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या शूर कन्या बाहेर पडणार आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी लक्ष्मीबाई यांची स्तुती केली.
ब्राम्होसची निर्मिती उत्तर प्रदेशात
उत्तर प्रदेशात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) स्टार्टअप कंपनी कार्यरत करण्यात आली आहे. या कंपनीत भारताचे क्षेपणास्त्र ब्राम्होसची निर्मिती केली जाणार आहे. इतके दिवस आपण 70 टक्के शस्त्रे विदेशातून आयात करीत होतो. आता 70 टक्के शस्त्रे देशात निर्माण होत आहेत, अशी माहिती याच कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उपस्थितांना दिली.









