अमेरिकेला टाकले मागे – 20 वर्षांमध्ये चीनने 16 पटीने वाढविली संपत्ती
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेला जगातील सर्वात शक्तिशाली देश मानले जाते. पण ही महासत्ता आता जगातील आणखीन एक अन्य शक्तिशाली अर्थव्यवस्था असणाऱया चीनच्या पिछाडीवर आहे. चीनने अमेरिकेला संपत्तीप्रकरणी मागे टाकले आहे. चीन आता जगातील सर्वात धनाढय़ देश ठरला आहे. मॅनेजमेंट कंसल्टेंट मॅकिन्झी अँड कंपनीच्या एका नव्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार मागील 2 दशकांमध्ये जगाची संपत्ती तीनपट वाढली आहे. 2000 साली जगाची एकूण संपत्ती 156 लाख कोटी डॉलर्स होती. 2020 मध्ये हा आकडा वाढून 514 लाख कोटी डॉलर्स झाला आहे.
जगाच्या एकूण संपत्तीत चीनची हिस्सेदारी सुमारे एक तृतीयांश आहे. चीनची संपत्ती 2000 साली केवळ 7 लाख कोटी डॉलर्स होती. 2020 मध्ये हा आकडा 120 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. यादरम्यान अमेरिकेची संपत्ती दुप्पट वाढून 90 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. चीन आणि अमेरिका जगातील दोन सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्था आहेत.









