बहुतेक मुद्दय़ांवर असहमती, चर्चा अयशस्वी झाल्याची तज्ञांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्वपूर्ण चर्चा झाली आहे. या चर्चेकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे तैवानच्या मुद्दय़ावरच या चर्चेत भर देण्यात आला होता. अमेरिका व चीन यांच्यात संघर्ष होऊ नये म्हणून यंत्रणा स्थापन झाली पाहिजे अशी सूचना बायडन यांनी केल्याचे समजते. तथापि, बहुतेक सर्व मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांमध्ये असहमतीच होती. भूमिकेत परिवर्तन करण्यास नकारच होता, अशी टिप्पणी नंतर करण्यात आली.
या बैठकीत बायडन व्हाईट हाऊसमधून आणि जिनंिंपग बिजींगमधून सहभागी झाले होते. बायडन यांच्यासमवेत अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ब्लिंकन होते. ही चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली अशी माहिती नंतर देण्यात आली. अमेरिका आणि चीन यांच्यात सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेचे रुपांतर सामरिक संघर्षात होऊ नये यासाठी दोन्ही देशांनी सावध असावयास हवे. संघर्ष होऊ न देण्यासाठी एक यंत्रणा असावी, अशी सूचना बायडन यांनी केली.
बराच काळ लांबली चर्चा
ही चर्चा सर्वसाधारणतः एक तास चालेल असे प्राथमिक अनुमान होते. तथापि, प्रत्यक्षात ती 3 तासांहून अधिक काळ चालली. बायडन आपले जुने मित्र आहेत. आपल्याला एकत्र काम करावे लागणार आहे. तणाव किंवा संघर्षापासून आपण वाचले पाहिजे. दोन्ही नेत्यांमध्ये संपर्क आणि सामंजस्य असावे, अशी सूचना जिनपिंग यांनी केली. यापलिकडे समान असा एकही मुद्दा नव्हता.
बहुतेक मुद्दय़ांवर असहमती अनेक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही नेत्यांमध्ये एकाही महत्वाच्या मुद्दय़ावर सहमती झाली नाही. तैवानच्या विषयावर दोन्ही नेते त्यांच्या भूमिकांवर ठाम राहिले. तैवान हा चीनचाच भाग आहे अशी चीनची भूमिका आहे. तर तैवान चीनचा भाग नसून एक देश आहे आणि चीनने तो गिळंकृत करण्याचा प्रयत्न करु नये, असा अमेरिकेचा आग्रह आहे. अमेरिकेने तैवानच्या सामरिक संरक्षणाची हमी दिलेली असून ती चीनला मान्य नसल्याने त्यांच्यात असहमती आहे. बायडन यांनी चर्चेत चीनमधील हय़ुगूर मुस्लीमांवर होणारे अत्याचार, तिबेट आणि हाँगकाँगमधील मानवाधिकारांचा प्रश्न, हवामानातील बदल, दक्षिण चीनी समुद्रातील चीनचा वर्चस्ववाद इत्यादी मुद्दे चर्चिले गेले. मात्र, कोणत्याही मुद्दय़ावर सहमती झाली नाही. त्यामुळे एक प्रकारे ही शिखर चर्चा अपयशीच ठरली. केवळ संघर्ष टाळला पाहिजे या एकाच मुद्दय़ावर समानता दिसली. त्यामुळे बव्हंशी जगाचा अपेक्षा भंगच झाला आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.









