पंतप्रधानांचे प्रतिपादन – ‘सरकार सर्वम’ ही मानसिकता संपतेय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नियंत्रक तसेच महालेखापालच्या (कॅग) पहिल्या ऑडिट दिन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भाग घेतला आहे. कॅग मुख्यालयात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ाचे अनावरण करत उपस्थित लोकांना संबोधित केले आहे. ‘सरकार सर्वम’ ही मानसिकता, सरकारचा हस्तक्षेप कमी होईल आणि लोकांचे काम सोपे होईल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत. सरकार ‘मिनिमम गव्हर्नमेंट-मॅक्सिसम गव्हर्नन्स’व काम करत असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले आहे.
देशात ऑडिटला एक भीती म्हणून पाहिले जाण्याचा काळ देशाने अनुभवला आहे. कॅग विरुद्ध सरकार ही आमच्या व्यवस्थेची मानसिकता झाली होती. पण सद्यकाळात ही मानसिकता बदलली आहे. आता ऑडिटला मूल्यवर्धनाचा महत्त्वाचा हिस्सा मानले जातेय असे पंतप्रधान म्हणाले.
बँकिंग क्षेत्रात वाढली पारदर्शकता
देशातील बँकिंग सेक्टरमध्ये पारदर्शकतेच्या अभावामुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या. याचाच परिणाम म्हणून बँकांचे एनपीए वाढत गेले. एनपीए दडवून देण्यासाठी पूर्वी करण्यात आलेले प्रकार आता समोर आले आहेत. पण आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मागील सरकारांचे सत्य देशासमोर ठेवले. समस्यांची ओळख पटविली तरच उपाय शोधता येतील असे मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले आहे.
लसीकरणाचे शिवधनुष्य
शतकातील सर्वात मोठी महामारी जितकी आव्हानात्मक होती, तितकीच याच्या विरोधातील देशाची लढाईही असाधारण राहिली आहे. आज आम्ही जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवत आहोत. काही आठवडय़ांपूर्वी देशाने 100 कोटी डोसचा पल्ला गाठला असल्याचे ते म्हणाले.
डाटाद्वारे समजणार इतिहास
जुन्या काळात कथांद्वारे इतिहास मांडला जात होता. पण 21 व्या शतकात डाटा हाच इन्फॉर्मेशन आहे. आगामी काळात आमचा इतिहास देखील डाटाद्वारे पाहिला आणि समजून घेतला जाईल. व्यवस्थेत पारदर्शकता येताच त्याचे परिणामही स्पष्टपणे दिसू लागतात. भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इको सिस्टीम ठरला आहे. देशात 50 हून अधिक यूनिकॉर्न उभे राहिले आहेत असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
कॅगने बदलली स्वतःची प्रतिमा
दशकांपर्यंत आमच्या देशात कॅगची ओळख, सरकारी फाइल्स आणि वहीखात्यांमध्ये डोकं खूपसून बसणारी संस्था म्हणून राहिली. कॅगशी संबंधित लोकांची हीच प्रतिमा झाली होती. परंतु येथील कर्मचारी आता वेगाने बदल घडवून आणत आहेत, प्रकियांना आधुनिक स्वरुप देत अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहेत. कॅग वेगाने आधुनिक होत असल्याचे मोदी म्हणाले.
मूल्यवर्धन महत्त्वाचा हिस्सा
एक संस्थेच्या स्वरुपात कॅग केवळ देशाच्या खात्यांचा हिशेब करत नाही, तर उत्पादकतेच्या प्रभावीकरणात मूल्यवर्धन देखील करते. याचमुळे ऑडिट दिवस आणि याच्याशी संबंधित कार्यक्रम आमचे चिंतन, मंथन, आमच्या सुधारणांचा महत्त्वपूर्ण हिस्सा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









